AFG vs ENG, U19 World Cup 2022: इंग्लंडचा 24 वर्षानंतर फायनलमध्ये, अफगाणिस्तानला एक चूक पडली महागात; भारत किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल अंतिम लढत
अफगाणिस्तान, इंग्लंड अंडर-19 विश्वचषक 2022 (Photo Credit: Twitter/ICC)

U19 World Cup 2022: अँटिगाच्या (Antigua) सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या ICC अंडर-19 विश्वचषकच्या पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडने (England) अफगाणिस्तानचा (Afghanistan) 15 धावांनी पराभव करत अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. पावसाने प्रभावित झालेला हा सामना 47 षटकांचा करण्यात आला. या सामन्यात इंग्लंड आधीच विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता, मात्र अफगाणिस्तानने प्रतिस्पर्धी संघाला कडवी झुंज दिली आणि 44 षटकांतच अफगाणिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचून इतिहास घडवेल असे वाटत होते. तथापि एक चूक संघाला महागात पडली आणि युवा ब्रिटिश संघाने 24 वर्षाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यासह अफगाणिस्तानचे प्रथमच आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. आता विजेतेपदाच्या लढतीत इंग्लंडचा सामना भारत (India) किंवा ऑस्ट्रेलियाशी (Australia) होईल ज्यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनल सामना आज होणार आहे.

अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे तर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 47 षटकांत 6 बाद 231 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ 9 गडी गमावून 215 धावाच करू शकला. अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचला आणि त्याला अननुभवीपणाचा फटका सहन करावा लागला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली आणि एका क्षणी इंग्लंडने 6 विकेट 131 धावांतच गमावल्या. अफगाणिस्तान संघ इतिहास रचण्याच्या वाटेवर आहे असे वाटत होते. मात्र ते विजयापासून फक्त काही धावा दूर राहिले. इंग्लंडच्या डावातील शेवटच्या 12 षटकांमध्ये अफगाणिस्तानची गोलंदाजी खूपच खराब राहिली आणि गोलंदाजांनी 95 धावा लुटल्या. हीच एक चूक संघाला महागात पडली आणि 6 विकेट गमावूनही इंग्लंडने 231 धावा केल्या.

इंग्लंडसाठी सलामीवीर जॉर्ज थॉमसने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, याशिवाय टॉप ऑर्डरमधील इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. पण मधल्या फळीत जॉर्ज बेलने 67 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या चेंडूवरच संघाने पहिली विकेट गमावली. मात्र, यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावा जोडून इंग्लंडच्या ताफ्यात खळबळ उडवून दिली. मात्र 94 धावसंख्येवर मोहम्मद इशाक (43) धावबाद झाल्यानंतर अफगाणिस्तानने आणखी दोन विकेट झटपट गमावल्या आणि संघाची धावसंख्या 4 गडी गमावून 106 अशी झाली. मात्र, पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत फलंदाजांनी अफगाणिस्तान संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.