IND vs PAK: भारत-पाक टी-20 सामना पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू
IND vs PAK (Photo Credit - Twitter)

आसाममधील शिवसागर जिल्ह्यात भारत-पाकिस्तान (IND vs PAK) टी-20 क्रिकेट सामना पाहत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून 34 वर्षीय बिटू गोगोई असे त्या व्यक्तीचे नाव आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गोगोई त्यांच्या काही मित्रांसह रविवारी संध्याकाळी एका स्थानिक सिनेमा हॉलमध्ये गेले होते, जिथे सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जात होते. पण, सामन्यादरम्यान गोगोई अचानक बेशुद्ध पडले. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, क्रिकेट सामन्यादरम्यान चित्रपटगृहात जास्त प्रमाणात ध्वनिप्रदूषण झाल्यामुळे गोगोई यांना हृदयविकाराचा झटका आला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, शिवसागर पोलिसांच्या पथकाने घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गोगोई निरोगी होते आणि त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. (हे देखील वाचा: IND vs PAK: कर्णधार रोहितने केले विराटचे कौतुक; अशी इनिंग कधी पाहिली नाही...तुला सलाम)

पाकिस्तानचा 4 गडी राखून केला पराभव 

टीम इंडियाने 364 दिवसांनंतर पाकिस्तानकडून मागील पराभवाचा बदला घेतला आहे. भारतीय संघाने रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. रनचेसमास्टर विराट कोहलीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, त्याने 53 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 82 धावांची नाबाद खेळी केली. संपूर्ण देश कोहलीच्या या 'विराट' खेळीचा आनंद साजरा करत आहे.