IND vs AUS (Photo Credit - ICC)

WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे पॉइंट टेबल काही दिवसांपूर्वी एकतर्फी असल्याचे दिसत होते. भारताने इतर संघांच्या तुलनेत चांगली आघाडी घेतली होती, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर फायनलची सर्व समीकरणे बदलली आहेत. आता अंतिम फेरीसाठी दोन-तीन नव्हे तर पाच संघांमध्ये थेट स्पर्धा आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप  टेबलमध्ये प्रत्येक संघाला जास्तीत जास्त किती गुण मिळू शकतात ते येथे जाणून घ्या. (हे देखील वाचा: India vs New Zealand 3rd Test: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना कधी अन् कुठे खेळला जाईल? येथे जाणून घ्या संपूर्ण तपशील)

कोणते आहेत ते पाच संघ?

भारत (India)

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत सध्या अव्वल स्थानावर आहे, ज्याची गुणांची टक्केवारी 62.82 आहे. सध्याच्या कसोटी चॅम्पियनशिपच्या वेळापत्रकात टीम इंडियाला अजून 6 सामने खेळायचे आहेत. जर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान निश्चित करायचे असेल तर त्यांना 6 सामन्यांमध्ये किमान चार विजय नोंदवावे लागतील. आता उर्वरित सामन्यांनंतर भारताच्या गुणांची कमाल टक्केवारी 74.56 असू शकते.

ऑस्ट्रेलिया (Australia)

ऑस्ट्रेलिया सध्या 62.50 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर कांगारू संघाने सर्व सामने जिंकले तर तो अव्वल स्थानावर राहील कारण त्याची कमाल गुणांची टक्केवारी 76.62 पर्यंत जाऊ शकते. सध्या ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर भारताविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांचा सामना खेळायचा आहे. याशिवाय श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामनेही आहेत.

श्रीलंका (Sri Lanka)

श्रीलंकेने अलीकडेच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला. खरे तर त्या मालिकेनंतर श्रीलंकेच्या अंतिम फेरीच्या आशा उंचावल्या आहेत. श्रीलंका सध्या 55.56 गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि ते कमाल 69.23 पर्यंत जाऊ शकते. श्रीलंकेला अजूनही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत.

न्यूझीलंड (New Zealand)

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा संघही टेबलमध्ये तळाच्या स्थानावर होता, मात्र भारताविरुद्धचे दोन सामने जिंकल्यानंतर किवी संघ दुसरी अंतिम फेरी खेळण्यासाठी आशावादी आहे. डब्ल्यूटीसी इतिहासातील पहिला विजेता संघ न्यूझीलंडची कमाल गुणांची टक्केवारी 64.29 पर्यंत जाऊ शकते.

 दक्षिण आफ्रिका (South Africa)

अंतिम फेरीचा मार्ग दक्षिण आफ्रिकेसाठी खूपच कठीण दिसत आहे कारण जेतेपदाच्या लढतीत जाण्यासाठी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील परंतु त्यानंतरही त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल. आफ्रिकेला अद्याप बांगलादेशविरुद्ध एक आणि पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत.