Virat Anushka Misprint News (Photo Credits: Twitter. Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना 11 जानेवारी 2021 रोजी कन्यारत्न झाले. गेल्या काही दिवसांपासून अनुष्काच्या गरोदरपणाच्या बातम्या येत होत्या, मात्र आता बाळाच्या जन्मानंतर इंटरनेट ही गोड बातमी मोठ्या प्रमाणावर साजरी करत आहे. दरम्यान काही नेटिझन्सनी ‘द हितवाडा’ (The Hitavada) या पब्लिशिंग हाऊसने विराट-अनुष्काशी संबंधित केलेली मोठी चूक दाखवून दिली. या प्रिंट मीडियाच्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर 'जम्मू-काश्मीरमधील 2 जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांना अटक' या मथळ्याखाली एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. या प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये विरुष्काचा फोटो दिसला. मात्र नक्कीच हे कृत्य हेतुपुरस्सर नव्हते, परंतु ट्विटरवर या वृत्ताबाबत प्रचंड टीका झाली.

हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अनेक लोकांनी यावर चित्रविचित्र प्रतिक्रिया दिल्या. काही लोक यावर हसले तर काहींनी विरुष्काची तुलना 'दहशतवाद्यां'शी केल्याने राग व्यक्त केला. या प्रकाशनाकडून फारच मोठी चूक झाली आहे. ही गोष्ट चुकून झाली असल्याचे म्हटले तरी यामुळे दोन्ही सेलेब्जची जी काही हानी व्हायची ती झालीच आहे. मात्र आता उत्सुकता आहे ती ही बातमी विरुष्कापर्यंत पोहोचते का नाही याची आणि जर का ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलीच तर, त्यांची यावर काय प्रतिक्रिया असेल.

या वर्तमानपत्राबद्दल बोलायचे झाले तर, द हितवाडा हे एक इंग्रजी दैनिक असून तो मुख्यतः भारताच्या मध्य भागात वितरीत केला जातो. तर अशा दोन सेलेब्जबाबत घडलेली चूक पाहता अशी अपेक्षा आहे की, हे दैनिक लवकरच याबाबत दिलगिरी व्यक्त करेल. दरम्यान, याधीही अनेक वर्तमानपत्रांनी सेलेब्जबाबत चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत मात्र ही बातमी खरच पचवायला कठीण होती.