सध्या देशभरात मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. अशात जनेतला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातील एक गोष्ट म्हणजे पावसाळ्यातील रस्त्यावरील खड्डे (Potholes). या खड्ड्यांची समस्या जवळजवळ प्रत्येक राज्यात पाहायला मिळत आहे. एखाद्या समस्येबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये (Kerala) घडला, जेव्हा एका तरुणाने रस्त्यावरील खड्ड्यांबाबत निषेध करण्यासाठी एक हटके पद्धत अवलंबली. राज्यातील मलप्पुरममध्ये एका व्यक्तीने खड्ड्यांविरोधात आंदोलन करत, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात आंघोळ केली तसेच त्या ठिकाणी योगाही केला.
महत्वाचे म्हणजे तरुणाने हे कृत्य आमदारासमोर केले. केरळमधील मलप्पुरम येथे आंदोलन करणाऱ्या तरुणाने सांगितले की, याठिकाणी रस्त्यावर खड्डय़ांमुळे अनेक अपघात झाले आहेत, त्यामुळे हा मुद्दा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी वेगळ्या मार्गाने आंदोलन करण्याचा विचार केला. मलप्पुरममध्ये पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्यावर पाणी तुंबले होते. त्याची दखल कोणीच घेत नव्हते. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी तरुणांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा तरुण आमदाराच्या गाडीसमोर खड्ड्यात आंघोळ करताना आणि योगा करताना दिसत आहे. त्यानंतर हा आमदार आपल्या गाडीतून खाली उतरतो व तरुणांशी संवाद साधतो. (हेही वाचा: जमिनीवर उतरत असताना विमानाचा भीषण अपघात; रस्त्यावरील वाहनांवर आदळले (Watch)
#WATCH | Kerala: A man in Malappuram protested against potholes on roads in a unique way by bathing & performing yoga in a water-logged pothole in front of MLA on the way pic.twitter.com/XSOCPrwD5f
— ANI (@ANI) August 9, 2022
दरम्यान, मुंबईतील संततधार पावसामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. मुंबईतील वाढत्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काही लोक जखमीही झाले आहेत. यामुळे मुंबईकरांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी मनसे कार्यकर्त्या कविता मोरे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांच्यासमोर अगरबत्ती लावून, नारळ फोडून, हनुमान चालिसाचे पठण केले गेले. याबाबत कविता म्हणतात, की प्रशासनाकडून आम्हाला खड्ड्यांपासून संरक्षण दिले जात नाही, त्यामुळे आता संकटमोचन हनुमानजींनी आमचे रक्षण करावे, म्हणून आम्ही एकत्र येऊन हनुमान चालीसाचे पठन केले.