Bhiwandi Building Collapse: भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली होती. त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झाले होते. याच पार्श्वभूमीवर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या खालिदला तब्बल 10 तसानंतर बाहेर काढण्यात आले होते. परंतु, ढिगाऱ्याखाली असताना खालिदने एक व्हिडिओ काढला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एका लीटरच्या पाण्याच्या बाटलीच्या सहाय्याने त्याने स्वत:चा बचाव केला आहे. दरम्यान, अनेकजण त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्याने ढिगाऱ्याखालून एनडीआरएफच्या जवानांचा आवाज ऐकला. जवानांनी दिलेल्या आवाजाला प्रतिसाद मिळाल्यानंतर खालिदला सुखरूप ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घनेतील मृतांची संख्या 39 वर पोहचली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेतील सर्व मृतांची ओळख देखील पटवली असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेतील जखमींना मुंबई महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे सह कोकणात काही ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
युट्यूब व्हिडिओ-
भिवंडी येथील इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. भिवंडी महापालिकेने शहरातील 102 धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.