Viral Video: भ्रष्टाचाराचा कळस! ग्रामस्थांनी चक्क हाताने उचकटला नव्याने तयार केलेला रस्ता; कंत्राटदारावर फसवणुकीचा आरोप, Jalna जिल्ह्यातील धक्कादायक घटना
रोडच्या कामातील भ्रष्टाचार (संग्रहित संपादित प्रतिमा)

खराब रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे (Bad Roads and Potholes) हे भारतीय लोकांसाठी शाप आहेत. रस्ता सुस्थितीत असला, तरी पावसाच्या एका सरीने त्याची दुरवस्था होते. दरवर्षी हा प्रकार पहायला मिळतो. या मुद्द्यावरून अनेक आंदोलने, उपोषने आणि हिंसाचारही झाला, पण परिस्थिती तशीच आहे. आता महाराष्ट्रात रस्त्याच्या कामातील फसवणुकीचे तसेच भ्रष्टाचाराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

राज्यातील जालना जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका नवनिर्मित रस्त्याचा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही गावकरी नव्याने बांधलेला रस्ता चक्क उचकटून दाखवत असल्याचे दिसत आहे. हा रस्ता चादर किंवा चटईप्रमाणे सहजपणे उचललेला आणि दुमडलेलाही दिसत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओमध्ये ग्रामस्थ रस्ता उचकटून दाखवताना भागातील कंत्राटदार राणा ठाकूरवर आरोप करत आहे. ठाकूरने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधल्याचे सांगत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून माती, रेत, खडी, सिमेंट वगैरे न टाकता थेट रस्त्यावरच चटई टाकून त्यावर डांबर टाकून रस्ता तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे कंत्राटदाराने नवीन तंत्राद्वारे सुसज्ज रस्त्याचे आश्‍वासन देऊन ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. (हेही वाचा: Snake Found in Midday Meal: बिहार मध्ये शाळकरी मुलांच्या मध्यान्ह भोजन खिचडी मध्ये आढळला मृत साप)

या रस्त्याच्या कामामध्ये कमालीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. ठेकेदार राणा ठाकूर याने अतिशय निरुपयोगी कामे केल्याचे ते सांगत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, हा रस्ता जर्मन तंत्रज्ञानाने बनवला गेला आहे. पण रस्त्याच्या स्थितीवरून तसे अजिबात वाटत नाही. रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाबाबत ग्रामस्थांमध्ये रोष वाढत चालला आहे.