आईला वाचवण्यासाठी आरोग्य केंद्राबाहेर तरुणाची मदतीची याचना (Photo Credit : Twitter)

उत्तर प्रदेश मधील (Uttar Pradesh) हरदोई (Hardoi) जिल्ह्यात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील सवाईजौर सामुदायिक (Sawaijour Community Health Centre) एक मुलगा आपल्या आईच्या उपचारासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता, मदतीची याचना करीत होता, मात्र आरोग्य केंद्राचा दरवाजा उघडला नाही व केंद्राच्या दारातच या तरुणाच्या आईने आपले प्राण सोडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला निपचित आरोग्य केंद्राच्या बाहेर झोपली आहे व तिचा घाबरून गेलेला मुलगा केंद्राचे दरवाजे उघडण्यासाठी प्रयत्न करत आहे, रडत आहे, मदतीसाठी याचना करीत आहे.

‘कोणी आहे का? कोणी आहे? अशा प्रश्नांनी हा व्हिडिओ सुरु होतो. त्यानंतर हा युवक केंद्राच्या दरवाजा ठोठावतो मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर एखादा कर्मचारी दिसेल आणि दार उघडेल या आशेने तो आरोग्य केंद्राच्या मागील बाजूसही जातो, पण तिथेही कोणीच नसते. हताशपणे हा तरुण परत येतो, खिडकीतून आत डोकावतो व कोणीतरी मदत करेल म्हणून खिडकीची काच फोडतो, मात्र काहीच प्रतिसाद मिळत नाही. अखेर हतबल झालेल्या या युवकाला नक्की काय करावे काळात नाही, इतक्यात शेजारी पहुडलेल्या त्याच्या आईचा जीव जातो.

पहा व्हिडिओ -

मिळालेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी ही घटना घडली आहे. हरदोई जिल्ह्यातील सांडी ब्लॉकच्या चतरखा गावची एक 62 वर्षीय वयोवृद्ध महिला, मुलगा सोनू सिंगसह फर्रुखाबादकडे दुचाकीवरून जात होती. जाताना एका वेगवान दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात वृद्ध महिला जखमी झाली, त्यानंतर तिच्या मुलाने रुग्णवाहिका बोलावली पण रुग्णवाहिका आली नाही. यानंतर हा तरुण आपल्या आईला कडेवर घेऊन हॉस्पिटलकडे रवाना झाला. थोड्या अंतरावर एका दुचाकीस्वाराने दोघांनाही सवाईजौर सामुदायिक आरोग्य केंद्रात पोहोचवले. मात्र तिथे कोणी डॉक्टर नसल्याने या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. (हेही वाचा: मद्यधुंद पोलिसाने आपल्या गाडीने महिलेला दोन वेळा चिरडले? पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण (Watch Video)

या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. आरोग्य केंद्राने असा दावा करतो की, सामुदायिक केंद्र बंद असताना हा रुग्ण तिथे पोहोचला होता. अशा परिस्थितीत, मुख्य गेट बंद होतो व मागील बाजूस रुग्ण तपासले जातात. हा तरुण मागे पोहोचला नाही व त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली नाही.