Uttar Pradesh Police Fight | (Photo Credits: ANI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील प्रयागराज (Prayagraj) येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही कर्मचाऱ्यांनी हातातील दंडूक्याने एकमेकांवर प्रहार केले. लाच (Bribe) घेण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याचे समजते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या या हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसेच, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) सोशल मीडियात व्हायरलही झाले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ट्विटरवर या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ शेअर केला आहे.

प्राप्त माहितीनुसार ही घटना एका पेट्रोल पंप नजीक घडली. पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. व्हिडिओत दिसते की, दोन पोलीस कर्मचारी एकमेकांसोबत हातापाई करत आहेत. हातातील दांडक्याने एकमेकांना मारहाण करत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला दिसते की, पोलीस व्हॅनमध्ये असलेल्या एका व्यक्तीसोबत वर्दीवर असलेले दोन पोलीस भांडण करत आहेत. इथे इतरही तीन व्यक्ती उपस्थित आहेत. ही घटना घडली तेव्हा तिथे एकूण सहा लोक उपस्थित असल्याचे व्हिडिओत दिसते.

व्हिडिओत दिसते की, भांडण करत असलेले असलेले दोन्ही पोलीस काही सेकंदातच एकमेकांच्या अंगावर धाऊन जात हातातील दंडुक्याने एकमेकांवर प्रहार करत आहेत. दोन्ही पोलीसांची हातापाई पाहून उपस्थित लोक त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. उपस्थितांच्या प्रयत्नानंतर पोलीस स्वत:ला आवरतात असे दिसते. (हेही वाचा, तुरुंगात Tik Tok चा व्हिडिओ शूट करणे महिला पोलिसाला पडले महागात, गमावली नोकरी (Watch Video))

एएनआय ट्विट

दरम्यान, दोन पोलीसांशिाय असलेल्या इतर लोकांनी घटनास्थळावरुन पळ काढला. गुन्हे विभागाचे पोलीस अधीक्षक (एसपी) आशुतोष मिश्रा यांनी सांगितले की, 'पेट्रोल पंप परिसरात 11 ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली. हा परिसर कोंढियारा पोलीस ठाणे अंतर्गत येतो. दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.'