मिठीतल्या प्रेयसीचे चुंबन कॅमेऱ्यात कैद; प्रियकराला ४ वर्षांची शिक्षा
(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

आपल्या १३ वर्षीय प्रेयसीचे चुंबन घेणे एका १६ वर्षीय प्रियकराला चांगलेच महागात पडले. भावनेने ओथंबलेल्या त्या प्रियकराने आवगाने तिचे चुंबन घेतले खरे. पण, आपले हे कृत्य घोर अपराध ठरु शकतो याची त्याला पुसटसशी कल्पनाही नसावी. त्याचे हे वर्तन गुन्हा मानले जाऊन प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. न्यायालयाने त्यानंतर अखेर त्याला तब्बल साडेचार वर्षांची शिक्षा ठोठावली.

प्रकरण आहे तुर्की देशातील दक्षिण प्रांतात असलेल्या अंतल्या येथील. एका स्थानिक न्यायालयाने प्रियकराचे वर्तन हे लैंगिक शोषण विरोधी कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, प्रियकर आणि प्रेयसी दोघेही एकाच शाळेत शिकतात. प्रियकराने प्रेयसीला शाळेच्या आवारातच आपल्या बाहुपाशात घेतले. आणि तिचे एक दीर्घ चुंबन घेतले. हा प्रकार मोबाईलमध्येही चित्रीत करण्यात आला. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ मोबाईलद्वारे एकमेकांना शेअर केला. त्यामुळे शाळा प्रशासनाने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, तुर्कीमध्ये या प्रकारामुळे जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेमुळे पोलिसांपुढेही प्रश्न निर्माण झाला आहे. बोलले जात आहे की, शाळेतील बसवाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी, विद्यार्थी-विद्यार्थीनींना ड्रग्ज डीलिंगपासून रोखण्यासाठी पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. याच पोलिसांनी चुंबन घेणाऱ्या त्या विद्यार्थ्याला न्यायालयात हजर केले आहे. तुर्कीतील एक वृत्तपत्र हुर्रियतने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी विद्यार्थ्याची ओळख जुहाल मर्व ओफिदान अशी झाली आहे. आरोपीच्या वकीलाचे म्हणने असे की, न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यात येईल.

दरम्यान, प्रियकर-प्रेयसी असलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीचे चुंबन घेतानाचा व्हिडिओ बनविणाऱ्या इतर ५ विद्यार्थ्यांनाही ओरपी करण्यात आले आहे. दरम्यान, या पाच आरोपींची सध्या सुटका करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला सुटका करण्यात आलेल्या या पाचपैकी एका आरोपीचे वकील शिक्षा सुनावन्यात आलेल्या प्रियकर विद्यार्थ्याच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, 'या विद्यार्थ्याला झालेल्या शिक्षेबाबत मला आश्चर्य वाटते. कारण, या शिक्षेमुळे त्याचे भविष्य बदलणार आहे. इतकी प्रदीर्घ शिक्षा न्यायालयाने कायम ठेवल्यास त्याला गुन्हेगार म्हणून ओळखले जाईल. ज्यामुळे तो भविष्यात उच्च शिक्षण घेऊन प्रतिष्ठीत नागरिक, व्यवसायिक, अधिकारी बनू शकणार नाही. त्यामुळे मला प्रश्न पडला आहे की, खरोखरच या गुन्ह्यात इतकी मोठी शिक्षा द्यायला हवी?'