आश्चर्यम! शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, कुटुंबातील 11 सदस्यांचे महिन्याभरात 23 वेळा लग्न व घटस्फोट
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

चीनमध्ये (China) एका कुटुंबाने सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. एका कुटुंबातील 11 जणांनी 2 आठवड्यात 23 वेळा एकमेकांशी लग्न केले आणि नंतर सर्वांनी घटस्फोटही घेतला. सध्या हा घोटाळा संपूर्ण चीनमध्ये चर्चेत आहे. झेजियांग प्रांतातील लिशुई शहरातील एका छोट्या गावात पॅन नावाच्या व्यक्तीला शहरी नूतनीकरण नुकसान भरपाई योजनेची माहिती मिळाली आणि या घोटाळ्याला सुरुवात झाली. चीनी वृत्तपत्र पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, स्थानिक रहिवाशांना त्यांच्याकडे मालमत्ता नसली तरी किमान 40 चौरस मीटर (430 चौरस फूट) माफक अपार्टमेंट्स देण्यात येत आहेत. या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी पॅन याने आपल्या पूर्व पत्नीशी लग्न केले. त्यानंतर 6 दिवसांत त्याला जमीन मिळाली आणि त्याने आपल्या पूर्व पत्नीला पुन्हा घटस्फोट दिला.

यानंतर सरकारच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी कुटुंबातील अन्य सदस्य कथित घोटाळ्यात सामील झाले. पॅनने जमिनीच्या लोभापायी आपल्या बहिणीशी, मेव्हाणीशीही लग्न केले. इतकेच नाही तर पॅनच्या वडिलांनीही आपल्या काही नातेवाईकांशी लग्न केले. लग्नानंतर हे सर्व लोक गावाचे रहिवासी झाले व त्यांना ही जमीन मिळाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी घटस्फोट घेतले. (हेही वाचा: नवऱ्याचे अतिप्रेम; पण कधीच भांडण होत नाही म्हणून बायकोने मागितला घटस्फोट)

अहवालानुसार पॅनने आठवड्यातून तीनदा लग्नाची नोंद केली होती. याबाबत 11 जणांचा पत्ता एकाच घराचा असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांना या प्रकरणात घोटाळा झाला असल्याचे दिसून आले व नंतर त्यांनी पॅनवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली आहे. पीपल्स डेलीच्या अहवालानुसार या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर इतरांना जामिनावर सोडण्यात आले आहे. अधिकारी या घटनेचा अजून खोलात तपास करत आहेत.