China: कंपनीमध्ये सुट्ट्या घेण्यासाठी अनेक अफलातून कारणे दिली जातात. कधी कधी कंपनीच कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवते. मात्र चीनमधील एक कंपनी चक्क तुम्हाला डेट करण्यासाठी खास सुट्टी देते. ती ही एक दोन दिवस नाही तर तब्बल 8 दिवसांची. चीनच्या जेहिआंग शहरातील दोन कंपन्या सिंगल महिलांना त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी ‘लव्ह लिव्ह’ (Dating Leaves) देत आहेत. या 'लव्ह लीव्ह'ची सवलत केवळ वयाच्या तिशीत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठीच आहे. महिलांना एकटेपणामुळे मानसिक ताण तणाव येऊ नये म्हणून या कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे. (हेही वाचा : नरेंद्र मोदींकडे मागितली पत्नीचा खून करून अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन दिवसांची सुट्टी)
चीनमध्ये लुनार न्यू इयर (Lunar New Year) साजरे केले जाते. यावेळी कर्मचारी 7 दिवसांची सुट्टी घेतात. याच काळात या कंपन्या सिंगल महिलांना ज्यादा 8 दिवसांची सुट्टी देतात. त्यांनी बाहेर जावे, डेट करावे, जोडीदार शोधावा हा त्यामागील उद्देश आहे. शहरातील एका शाळेने अविवाहित शिक्षिकांना 'लव्ह लीव्ह' दिली होती. याच निर्णयाचे अनुकरण संबंधित कंपन्यांनीही केले आहे.
चीनमध्ये पंचविशीपुढच्या मुलीकडे तितकेसे सन्मानाने पहिले जात नाही. त्यांना ‘उरल्या सुरल्या मुली’ असे समजले जाते. या मुलींना पुढे लग्नासाठी फार समस्या उद्भवतात. हीच गोष्ट ओळखून या कंपन्या लव्ह लिव्ह देत आहेत. 'लव्ह लीव्ह' ची कल्पना ही एका ठराविक वयानंतरही एकट्या राहणाऱ्या मुलींना लग्नासाठी तयार करण्याच्या चीनी सरकारच्या प्रचारतंत्राचाच एक भाग आहे.