World’s Smallest Saint: हरिद्वार कुंभमेळ्यात आले जगातील सर्वात छोटे साधू; उंची 18 इंच, वजन 18 किलो (Watch Video)
Narayan Nand Giri Maharaj (Photo Credits: Reuters)

कुंभमेळ्यात (Kumbh Mela 2021) साधू-संतांचे वेगवेगळे रंग दिसतात. काही लोक त्यांच्या अद्वितीय साधनेने लोकांचे लक्ष वेधून घेतात, तर काही जण त्यांच्या पोशाखामुळे वेगळे ठरतात. अशात आपली उंची व वजनामुळे नारायण नंद गिरी महाराज (Narayan Nand Giri Maharaj) यांची कुंभात बरीच चर्चा होत आहे. त्यांना 'जगातील सर्वात लहान साधू' (World’s Smallest Saint) समजले जाते. स्वामी नारायण नंद यांची उंची 18 इंच असून, वजन 18 किलो आहे. ते 55 वर्षांचे आहेत. मात्र ते चालू शकत नाही किंवा उभा राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांचे शिष्य त्यांची काळजी घेतात. सध्या या साधूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गुरुवारपासून हरिद्वार कुंभमेळ्यास प्रारंभ झाला आहे. कुंभमेळ्याच्या सुरूवातीला संपूर्ण हरिद्वारमधील वातावरण भक्तिमय झाले आहे. या मेळ्यात सहभागी होणारे देशातील विविध भागातील साधू आणि संत आकर्षणाचे केंद्र ठरतात. यावेळी चर्चा आहे ती उंचीने कमी असणारे नागा साधू नारायण नंद गिरी महाराज यांची. बाबा नारायण नंद गिरी महाराजांच्या दर्शनासाठी लोक दूरदूरून येत आहेत. कुंभमेळ्यात आलेल्या भाविक त्यांच्याबरोबर सेल्फी घेत आहेत. नारायण नंदा गिरी महाराज हे जूना अखाड्याचे नागा बाबा आहेत. दिवसभर बाबा शिवाच्या भक्तीत लीन असतात. (हेही वाचा: गणपती सारखा चेहरा असणाऱ्या बाळाचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल, जाणून घ्या सत्यता)

स्वामी नारायण नंद मूळचे झांसी येथील आहेत. ते कुंभ 2010 मध्ये जुना आखाडामध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी नागा संन्यासीची दीक्षा घेतली. नागा साधू होण्यापूर्वी त्यांचे नाव सत्यनारायण पाठक होते. नारायण नंद गिरी महाराज यांना कानाने कमी ऐकू येत त्यामुळे त्यांच्या अंघोळीपासून ते पूजा पाठ पर्यंत सर्व गोष्टींमध्ये त्यांचा शिष्य राजपाल त्यांना मदत करतो. हरिद्वारमधील श्री पंच दशनाम जूना अखाड्याजवळ बिर्ला घाट पुलाच्या काठावर नारायण नंद यांनी आपला तळ ठोकला आहे. याच ठिकाणी भक्त त्यांच्या दर्शनासाठी येत आहेत.