आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन (Teacher's Day). भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंती दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षक आणि त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी दिलेले योगदान यासाठी हा दिवस सर्मपित केलेला आहे. खरंतर शिक्षक विद्यार्थ्यांच्या रुपात देशाची तरुण पीढी घडवत असतात. याच तरुण पीढीवर देशाचा विकास आणि प्रगती अवलंबून असते. समाजाप्रती शिक्षकांचे असणारे हे भरगोस योगदान लक्षात घेत आज गुगलने देखील देशांतील सर्व शिक्षकांचा डुडल साकारुन सन्मान केला आहे. आज डुडलवर सुंदर आर्टवर्क दिसत आहे. यात शिक्षक शिकवत असलेल्या विषयांचा अंतर्भाव दिसत आहे. भुगोल, विज्ञान, गणित, इंग्रजी, कला आणि इतर विषयांचे प्रतिकात्मक स्वरुप या सुंदर आर्टवर्कमध्ये पाहायला मिळत आहे. गुगल डुडलच्या वेबपेजनुसार, कोविड-19 संकटात देखील भविष्यातील पीढी घडवण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानार्थ हे आर्टवर्क साकारण्यात आले आहे. (शिक्षक दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, HD Images, Quotes शेअर करून शिक्षकांप्रती व्यक्त करा आदरभाव!)
शिक्षक दिन 2020 च्या गुगल डुडलमध्ये पट्टी, रंगकाम करण्याची पॅलेट, भूमितीय चिन्हे दिसत आहे. तर एक Google मधील एक O शनी ग्रहाच्या रुपात दिसत आहे. याद्वारे अभ्यासातील विविध विषय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. टीचर्स डे 2020 गुगल डुडल हे Kevin Laughlin या डुडलर ने साकारले आहे. यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुगल मुख्यालयात पुरस्कार विजेत्या शिक्षकांची भेट घेतली होती. दरम्यान कोवि़ड-19 संकटात देखील शिक्षक दाखवत असलेला सहयोग उल्लेखनीय आहे. सध्याच्या कठीण काळात शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे आणि शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारे अभ्यासात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिक्षक आपले गुरु, मित्र आणि टीकाकार असतात. विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम क्षमता बाहेर काढण्यासाठी ते झटत असतात. महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे की, "शिक्षकांवर जगाला उत्तम आकार देण्याची जबाबदारी असते. विद्यार्थ्यांमधील बेस्ट व्हर्जन घडवण्यासाठी ते काम करतात." आज शिक्षक दिनानिमित्त आपल्या आयुष्यातील सर्व शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद देऊया आणि आजचा शिक्षक दिन त्यांच्यासाठी खास करुया.