AIIMS मधील आरोग्य सेवकांना निकृष्ट दर्जाचे PPE Kits आणि N95 Mask पुरवण्यात आले? PIB Fact Check ने सांगितले सत्य
Healthcare worker (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात AIIMS मधील आरोग्य सेवकांना निकृष्ट दर्जाचे PPE Kits आणि N95 Mask पुरवण्यात आल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे. एका पत्रकाराने असा दावा केला असून त्यात त्याने AIIMS मधील आरोग्य सेवकांना आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या दर्जापेक्षा कमी दर्जाचे मास्क आणि पीपीई कीट्स पुरवण्यात आले, असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना भारत सरकारच्या PIB Fact Check हे दावे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

एका ट्विटच्या माध्यमातून पत्रकाराने हा दावा केला होता. त्यात त्याने म्हटले की, "गेल्या 48 तासांत AIIMS चे 50 पेक्षा अधिक कर्मचारी कोविड-19 पॉझिटीव्ह आढळले आहेत. AIIMS च्या डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, आम्हाला पुरवण्यात आलेले PPE Kits आणि N95 Mask हे अगदी निकृष्ट दर्जाचे आहेत. याबद्दल आम्ही आवाज उठवल्यानंतर आम्हाला धमक्या देण्यात आल्या. तसंच करिअर संपवण्यात येईल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे आम्हाला व्हायरसपेक्षा सरकारच्या या भूमिकेची अधिक भीती वाटत आहे."

यावर उत्तर देताना PIB Fact Check ने असे म्हटले आहे की, "हे दावे अत्यंत चुकीचे आहेत. मास्क आणि पीपीई कीट हे आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिलेल्या दर्जाचे असून त्यांना AIIMS कडून मान्यता पात्र झाली आहे. 95% आरोग्य सेवकांना कोरोनाची बाधा ही रुग्णांकडून झालेली नसून त्यासाठी इतर स्त्रोत कारणीभूत आहेत." (Fact Check: सॅनिटायझरमुळे कॅन्सर होतो? COVID-19 Pandemic मध्ये व्हायरल होणाऱ्या या मेसेज मागील सत्य काय?)

PIB Fact Check Tweet:

या संदर्भात AIIMS कडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आरोग्य सेवकांना पुरवण्यात आलेले PPE Kits आणि N95 Mask हे आरोग्य मंत्रालयाकडून ठरवून देण्यात आलेल्या दर्जाचेच आहेत, असे AIIMS कडून सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी AIIMS मधील डॉक्टरांसह 11 आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण 206 हॉस्पिटल कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. 1 फेब्रुवारी पासून 206 आरोग्य सेवक, 10 निवासी डॉक्टर्स, 26 नर्सेस, 9 टेक्निशन्स, 5 मेस कर्मचारी, 49 हॉस्पिटल कर्मचारी, 34 स्वच्छता कर्मचारी आणि 69 सुरक्षा रक्षक यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती AIIMS ने PTI या वृत्तसंस्थेला दिली आहे.