जवळजवळ 10 महिन्यांनंतर सर्व लोकांसाठी मुंबईची लोकल ट्रेन (Mumbai Local) सुरु केली गेली आहे. एकीकडे याबाबत समाधान आहे तर दुसरीकडे धोकादायक आणि जीवावर बेतणारी स्टंटबाजीही (Stunt) चालू झाली आहे. ताजे प्रकरण मध्य रेल्वेवरील सायन आणि दादर स्टेशन दरम्यान घडले आहे, जिथे काही युवक असे स्टंट करताना दिसून आले आहेत. या गोष्टीचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, याबाबत चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. 7 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9.30-10 वाजता, मुंबईच्या अंबरनाथकडून सीएसएमटीकडे जाणारी लोकल निघाली. यावेळी सायन ते दादर दरम्यान ट्रेनच्या गेटवर उभे असलेले काही युवक धोकादायक स्टंटिंग करताना दिसून आले.
या धावत्या लोकलमध्ये काहीजण ट्रॅकजवळ उभे असलेल्या खांबांना हात लावण्याचा प्रयत्न करीत होते. काहीजण या गेटला लटकताना दिसले होते. एवढेच नाही तर एक स्टंट असा होता की, यामध्ये युवक दुसऱ्या दिशेने येणाऱ्या ट्रेनच्या ड्रायव्हर काचेला हात लावताना दिसून आला. हे स्टंट इतके धोकादायक होते की ज्यामुळे या तरुणांचा जीव जाऊ शकला असता. मुंबई लोकलला शहराची लाईफलाईन म्हणून ओळखले जाते. परंतु त्यामध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाश्यांच्या अशा प्रकारच्या स्टंटबाजीमुळे ही लोकल काहीवेळा डेथलाइन म्हणून ओल्काहाली जाते. (हेही वाचा: ओडिशा: पेट्रोल पंपावरील स्टिलच्या पाईप मध्ये अडकला किंग कोब्रा, फसलेल्या सापाची सुटका कशी केली पहा त्याचा Video)
अनेक महिन्यांनतर स्थानिक लोकांसाठी मुंबई लोकल सुरु होऊन एक आठवडा उलटतोय तोपर्यंतच जीवावर बेतणाऱ्या स्टंटिंगच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. असा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनी स्टंट करणाऱ्या युवकांविरूद्ध कडक चौकशीचे आदेश दिले असून, संपूर्ण प्रकरणाच्या तपासाचेही आदेश दिले आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वेने असे स्टंट थांबवण्यासाठी ड्राइव्ह सुरू केली आहे. इतकेच नाही तर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.