Nile Crocodiles | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Nile Crocodile Attacks Video: प्राणीसंग्रहालयात असलेल्या एका 15 फूट लांब नाईल मगरीने केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती थोडक्यात बचावला. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना दक्षिण आफ्रिकेतील क्वा-झुलु नताल येथील बॅलिटो येथील क्रोकोडाइल क्रीक थीम पार्कमध्ये घडली. अंगावर रोमांच उभे करणारी आणि कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केवळ अपवाद म्हणूनच हा व्यक्ती मगरीच्या जबड्यातून बालंबाल (South African Zookeeper Narrowly Escapes 15-Foot Crocodile Attack) बचावला. अन्यथा त्याचा मृत्यू काहीच क्षणांच्या अंतरावर येऊन ठेपला होता. सांगितले जात आहे की, मगरीच्या जबड्यात साबडलेला हा व्यक्ती प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी आहे आणि तो मगर तज्ज्ञ म्हणून काम करतो. घटना घडली तेव्हा तो उपस्थित नागरिक आणि पर्यटकांना काही प्रात्यक्षीके करुन दाखवत होता.

मगरीसोबत मस्करी अंगाशी

व्हिडिओत पाहायला मिळते की, प्राणीसंग्रहालयात काही मगरी आहेत. त्यातील काही तर एकदम लांब आणि बऱ्याच मोठ्या आहेत. या मगरींना हा व्यक्ती हातात काठी घेऊन ढोसलत होता. तो असे का करत होता हे समजू शकले नाही. मात्र, निवांत पहुडलेल्या आणि शांत मगरींशी तो खेळण्याचा प्रयत्न करत होता. बहुदा मगरी त्याच्या चाळ्यांना वैतागल्या असाव्यात किंवा त्याचे हे नियमीत आणि सवयीचे कृत्य असले तरी त्या क्षणी मगर त्याला प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत नसावी. त्या व्यक्तीच्या काठीने ठोसलण्याला वैतागलेली मगर अचानक खवळते आणि त्याच्यावर चाल करते. धक्कादायक म्हणजे त्याच्या शरीराचा काही भाग तिच्या जबड्यात येतो. या वेळी तो स्वत:ही घाबरलेला असतो आणि उपस्थित पर्यटकही. घडलेली घटना पाहून उपस्थित पर्यटक मदतीसाठी आरडाओरडा करतानाही पाहायला मिळतात. त्यांचा आवाजही ऐकू येतो. Reaction Unit South Africa नावाच्या फेसबूक वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. (हेही वाचा, Alligator Eating Up Another: मोठी मगर छोट्या मगरीस खातानाचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video))

व्हिडिओ

मगरीच्या हल्ल्यात पायाला दुखापत

घटना घडली तेव्हा तिथे दोन मगरी होत्या. त्यातील एकीने या व्यक्तीवर हल्ला केला. त्याच वेळी तिथे दुसरीही मगर धावून आली. दरम्यान, एका फेसबुक युजरने या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर जगभरातील वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, क्रोकोडाइल क्रीक थीम पार्क व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याला ताततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तसेच, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोणत्याही प्रकारचा धोका नाही.