'या' देशात कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा; दर महिन्याला करु शकतात 3000 रुपयांची खरेदी
Representational Image (Photo Credits: File Photo)

कैद्यांचे आयुष्य किती खडतर असते, हे आपण सिनेमा, सिरीयल्स आदी माध्यमातून पाहिले आहे. कैद्यांना अनेक बंधनं असतात, हे ही तुमच्या ऐकीवात असेल. पण तुम्हाला कोणी सांगितले की, कैदी देखील ऑनलाईन शॉपिंग करु शकतात. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण एक देश असा आहे जिथे कैद्यांनाही ऑनलाईन शॉपिंगची मुभा आहे. इतकंच नाही तर प्रत्येक महिन्याला हे कैदी चक्क 3 हजार रुपयांची शॉपिंग करु शकतात. हा देश आहे 'चीन.'

चीनमध्ये कैद्यांना महिन्याला 3 हजार रुपयांची ऑनलाईन शॉपिंगचे स्वातंत्र्य दिले जाते. फिंगर प्रिंटच्या माध्यमातून शॉपिंग मशीनमध्ये लॉग इन करुन कैदी खरेदी करु शकतात. यासाठी याचवर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत गुआंगडोंग जेल प्रशासनिक ब्युरोने कोंगहुआ जेलमध्ये एक पायलट प्रोजेक्ट चालवण्यात आले होते. यात प्रोजेक्ट अंतर्गत सुमारे 13,000 कैद्यांनी ऑर्डर देत तब्बल 4 लाखांची खरेदी केली होती. या प्रोजेक्टच्या यशानंतर कैद्यांना जेलमध्ये शॉपिंगची सुविधा सुरु करण्यात आली.

आता जेलच्या इमारतीत ऑनलाईन शॉपिंगची सुविधा सुरु करण्यात आली असून त्यात कैदी सिग्रेट, खाण्याचे सामान, कपडे इत्यादी 200 वस्तूंची खरेदी करु शकतात. जानेवारी 2019 पूर्वी ही सुविधा कैद्यांसाठी उपलब्ध नव्हती. तेव्हा कैद्यांना सामानाची यादी करुन ती जेल अधिकाऱ्याकडे द्यावी लागत असे. त्यानंतर जेल अधिकाऱ्याकडून ते सामान कैद्यांपर्यंत पोहचत असे. मात्र ही प्रक्रीया अत्यंत वेळखाऊ होती. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगची सुविधा कैदी आणि जेल अधिकारी या सर्वांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.