Pornhub: परवानगीशिवाय अपलोड केले Sex Videos; 34 महिलांची पॉर्न वेबसाइट ‘पॉर्नहब’विरुद्ध कोर्टात धाव
Representational Image (Photo Credits: File Image)

जगातील टॉप पॉर्न वेबसाइट्सपैकी (Porn Website) एक असलेल्या पॉर्नहबवर (Pornhub) अनेक महिलांनी खटला दाखल केला आहे. महिलांचा आरोप आहे की, या वेबसाइटने त्यांचे व्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय अपलोड केले ज्याद्वारे वेबसाईटने कोट्यवधींची कमाई केली. या प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटवर 34 महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. पॉर्नहब वेबसाइटची मूळ कंपनी 'माइंडजीक' वर आरोप आहे की, बलात्कार, चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि इतर प्रकारच्या सेक्स रॅकेटचे व्हिडीओ कंपनीने वेबसाइट्सवर अपलोड केले आहेत.

मानवी तस्करी आणि लैंगिक अत्याचाराचा आरोपही या कंपनीवर आहे. या महिलांनी असा आरोप केला आहे की, पॉर्नहब वेबसाइट जाणूनबुजून अल्पवयीन मुलांसह महिलांवरील बलात्कार आणि लैंगिक छळाचे व्हिडिओ दाखवून पैसे कमवत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरात या महिलांनी हा दावा दाखल केला आहे. कंपनीने नुकसानीची भरपाई करावी अशी त्यांची इच्छा आहे.

यातील एका महिलेने सांगितले की, 2014 मध्ये तिला कळले की तिच्या प्रियकरसमवेतचा तिचा नग्न व्हिडिओ तिच्या संमतीशिवाय पॉर्नहबवर अपलोड झाला होता. त्यावेळी ती फक्त 13 वर्षांची होती. जेव्हा या महिलेने याबद्दल पॉर्नहबकडे तक्रार केली तेव्हा तिचा व्हिडिओ कित्येक आठवड्यांनंतर काढण्यात आला. या सर्व आरोपांबद्दल माइंडजीक म्हणाले की, हे सर्व दावे खोटे आणि निराधार आहेत. वेबसाइटवर केलेल्या आरोपात कोणतेही सत्य नाही. कंपनीच्या वतीने आपल्या जुन्या निवेदनात असे म्हटले होते की, ते वेबसाइटवर कोणताही अवैध कंटेंट अपलोड करत नाहीत व याची पूर्णपणे काळजी घेतली जाते.

यापैकी 14 महिलांनी सांगितले की, जेव्हा त्यांचे व्हिडीओ अपलोड झाले तेव्हा त्या अल्पवयीन होत्या. यापैकी बहुतेक महिला अमेरिका, थायलंड, कॅनडा, कोलंबिया आणि ब्रिटनमधील आहेत. दरम्यान, 2019 मध्ये या वेबसाइटवर 42 अब्ज व्ह्यूज आले होते आणि 60 लाखाहून अधिक व्हिडिओ अपलोड केले गेले होते. सीबीएसच्या मते, वापरकर्त्यांना या साइटवर कंटेंट पोस्ट करण्यापूर्वी त्यांची ओळख व्हेरीफाय करायची आवश्यकता नाही, तसेच त्यांना व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीच्या परवानगीचीही आवश्यकता नाही.