फिलीपीन्स (Philippines) मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नाईट कर्फ्यू (Night Curfew) दरम्यान पाणी विकत आणण्यासाठी बाहेर पडलेल्या व्यक्तीला देण्यात आलेली शिक्षा त्याच्या जीवावर बेतली आहे. कर्फ्यू दरम्यान बाहेर पडल्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीला 300 बैठका मारण्यास सांगितले. मात्र बैठका मारत असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना 1 एप्रिल 2021 च्या संध्याकाळी फिलीपीन्स मधील मलिना जवळील जनरल ट्रियास (General Trias) या गावात घडली. (सिंगापूर मध्ये सापडला अंडरवेअर चोर; लॉकडाऊन मोडत महिलेच्या Lingerie चोरताना पोलिसांनी केली अटक, वाचा सविस्तर)
Darren Manaog Peñaredondo असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो 28 वर्षांचा होता. त्याची लिव्ह इन पार्टनर Reichelyn Balce हिने एका मुलाखती दरम्यान या घटनेची माहिती दिली. Peñaredondo आणि एका व्यक्तीला कर्फ्यूच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 100 बैठकांची शिक्षा सुनावली. परंतु, त्यांनी त्या बैठका एकत्रितरीत्या न मारल्यामुळे त्यांना पुन्हा सुरुवात करण्यास सांगितले. असे करत त्यांना एकूण 300 बैठका माराव्या लागल्या. गावातील गार्ड्सने Peñaredondo त्या रात्री पोलिस स्टेशनला नेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शहरातील मुख्य पोलिस अधिकारी Colonel Marlo Nillo Solero यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कर्फ्यूचे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध अशा कोणत्याही प्रकारची शिक्षा पोलिसांकडून दिली जात नाही, असे त्यांनी सांगितले. जनरल ट्रियास गावाचे महापौर Antonio Ferrer यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
Darren Manaog Peñaredondo च्या मृत्यूच्या बातमीनंतर फिलिपीन्समधील मानवी अधिकार संघटना Karapatan यांनी या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांविरुद्ध राष्ट्रीय लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. फिलिपीन्स मध्ये आतापर्यंत 8 लाख 12 हजार कोरोना रुग्ण आढळले असून 13 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 6 लाख 46 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.