Rasgulla in Panchayat Elections 2021: ​उमेदवाराला रसगुल्ला भारी पडला, पोलिसांनी थेट कायदा दाखवला
UP Police | ( Photo Credits: Twitter )

उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक 2021 (Panchayat Election Uttar Pradesh 2021) मध्ये पोलिसांनी चक्क 20 किलो रसगुल्ला (Rasgulla) दोन आरोपींसोबत जप्त केला आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल निवडणुकीशी रसगुल्ल्याचा काय संबंध? पण उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Prades) तो आला आहे किंवा उत्तर प्रदेश पोलिसांनी तो कायद्याच्या चौकटीत आणला असावा. त्याचे झाले असे उत्तर प्रदेशमध्ये त्रिस्तरीय पंचायत निवडणुका (Panchayat Election Uttar Pradesh) पार पडत आहेत. सर्व उमेदवार, पक्ष प्रचाराला लागले आहेत. अशात एका उमेदवाराला मतदारांचे तोंड गोड करण्याची लहर आली. त्याने 20 किलो रसगुल्ला ऑर्डर केला. ही खबर पोलिसांना मिळाली. उत्तर प्रदेश पोलीस (UP Police) तातडीने घटनास्थळी आले. एकदम इतक्या मोठ्या प्रमाणावर रसगुल्ला पाहिल्यावर पोलिसांच्याही लक्षात आले इथे तर कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. झाले. पोलिसांनी लगेच कारवाईचा बडगा उगारला.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना हापुड देहात पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. कोरोना महामारी दरम्यान असलेल्या लॉकडाऊन काळात पार पडत असलेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारांवर प्रचार करण्यास मर्यादा येते आहे. अशा वेळी उमेदवार मतदारांशी संपर्क साधण्यासी अल्पोपहाराची मेजवानी देताना दिसत आहेत. यात रसगुल्ला, जिलेबी, समोसा अशा पदार्थांची रेलचेल आहे. (हेही वाचा, Maggi Laddu: बाबो! युजरने मॅगीपासून बनवले लाडू, सोशल मिडियावर फोटो व्हायरल; लोक म्हणतात- 'आता हे सहन होत नाहीये', पहा मजेशीर प्रतिक्रिया)

हापुडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अशाच एका उमेदवाराने मतदारांसाठी रसगुल्ला आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रसगुल्ल्यासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरुनही याबाबत माहिती दिली. या माहितीत पोलिसांनी म्हटले आहे 'कोविड 19 मरामारी अधिनियम आणि कलम 144CRPC कायद्याचे उल्लंघन करुन जमाव जमवल्याप्रकरणी आणि रसगुल्ला वाटल्या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 20 किलो रसगुल्ले जप्त केले आहेत.'

दरम्यान, प्राप्त माहिती अशीही आहे की, गाजियाबाद येथील लोणी पोलिसांनी उमेदवारांनी मतदारांसाठी आणल्या जाणाऱ्या दूध, जिलेबी आणि माव्याच्या साठ्यावरही छापा मारला होता. या प्रकरणात पलिसांनी 7 जणांना अटकही केली होती. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर मिठाई बनविणाऱ्या दुकानदारांवरही नजर ठेवली जात आहे.