म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणून बहुदा अनेक गोष्टींसाठी इतरांवर विसंबून राहण्याचा जेष्ठांचा कल असतो. आता नाही जमत बाबा, दमले, थकले ही तर नेहमीचीच मानसिकता. पण या मानसिकतेला छेद देत आस्ट्रेलियातील (Australia) एका 102 वर्षीय आजीबार्इंनी एक थक्क करणारा पराक्रम केला आहे. या आजीबार्इंनी या वयात चक्क 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग करत या वृद्धांसमोर नवा पायंडा पाडला आहे. आजीबाईंच्या या पराक्रमाची सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा आहे.
एड्रेनालाईन जंकी इरेन ओशेआ (Irene O'Shea ) असे या आजीबार्इंचे नाव आहे. हा पराक्रम करणाऱ्या त्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. आकाशातून उडी घेतल्यानंतर 220 किलोमीटरच्या वेगाने खाली येताना त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. हा थरारक अनुभव त्यांनी मस्त एन्जॉय केला, असेही त्यांनी सांगितले.
मोटार न्यूरॉन (motor neurone) या आजाराने त्यांच्या मुलीला जीव गमवावा लागला. त्यानंतर याच आजारासाठी निधी गोळ्या करण्याच्या उद्देशाने त्यांना झपाटून टाकले आणि त्याच जिद्दीतून स्कायडाइव्हिंगचा विक्रम त्यांनी केला.