Kanta Murti (Photo Credits: ANI)

मुंबईत (Mumbai) 3-5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसात मुंबई तुंबली. तेव्हा या बुडत्या मुंबईला वाचवण्यासाठी माटुंग्यातील (Matunga) कांता मुर्ती (Kanta Murti) नामक महिला धावून आली. मात्र या महिलेला बीएमसी अधिकाऱ्यांकडून चांगलीच समज देण्यात आली आहे. 4 ऑगस्ट रोजी वाढत्या पावसासोबत मुंबईतील रसत्यांवरील पाणी वाढू लागल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी कांता यांनी गटाराचे झाकण उघडले आणि त्याच्या बाजूला उभी राहून वाहनांना मार्ग दाखवत होत्या. तब्बल 7 तास भर पावसात उभी राहून ओपन मॅनहोलमुळे अपघात होऊ नये याची काळजी कांता घेत होत्या. या घटनेचा व्हि़डिओ जोरदार व्हायरल झाला. तसंच प्रसार माध्यमांनी देखील याची दखल घेत कांता यांचं कौतुक केलं.

मात्र या सर्व प्रकारामुळे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी नाराज झाले आहेत. त्यांनी कांता यांना चांगली समजही दिली आहे. याची माहिती खुद्द कांता यांनी दिली. "पाण्याचा निचरा होण्यासाठी मी गटाराचे झाकण उघडले आणि तिथे उभी राहून वाहनांना मार्ग दाखवला. पण नंतर बीएमसीचे अधिकारी आले आणि मला या प्रकाराबद्दल ओरडले," असे कांता मुर्ती यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

ANI Tweet:

कांता मुर्ती यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी देखील त्यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांता मुर्ती या मांटुग्यातील फुटपाथवर राहतात. त्यांचा नवरा दिव्यांग असून त्या हार-फुले विकून घर चालवतात. दरम्यान या पावसात त्यांच्या घराचंही नुकसान झालं. मात्र तरी देखील त्यांनी अपघात टाळण्यासाठी मुंबईकरांची मोठी मदत केली.

मागील आठवड्यात मुंबईत तुफानी पाऊस झाला. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. सखल भाग, रस्ते, रेल्वे मार्ग जलमय झाले होते. पत्रे उडणे, घरात पाणी शिरणे या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. वृक्ष, भिंत कोसळल्यामुळे वाहतुकीचा खोळंबाही झाला. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले आहे.