महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे प्रशासनासोबतच नागरिकांची देखील चिंता वाढली आहे. दिवसागणिक वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अपुरी पडत असलेली आरोग्ययंत्रणा पाहता सध्या राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पण यामुळे यंदाच्या दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा कशा पार पडणार? ही मोठी भीती पालक, विद्यार्थ्यांना आहे. प्रशासनाकडून त्याच्या पर्यायांचा विचार सुरू असतानाच काहींनी सोशल मीडियामध्ये यंदा 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा रद्द (Maharashtra Board SSC, HSC Exams) झाल्याचं वृत्त शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad )यांच्या फोटोसोबत मॉर्फ करत वायरल करायला सुरूवात केली आहे. त्यांनी ट्वीटर वर तशी माहिती दिल्याचं या खोट्या वृत्तामध्ये भासवण्यात आले आहे. पण आज (11 एप्रिल) वर्षा गायकवाड यांनी तो फोटो शेअर करत अफवांना बळी पडू नका अधिकृत संकेतस्थळ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरच विश्वास ठेवण्याचं आवाहन केले आहे.
दरम्यान वर्षा गायकवाड यांचा फोटो मॉर्फ केलेल्या मेसेजमध्ये तातडीच्या मीटिंगमध्ये यंदा 10 वी 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या असून परीक्षेऐवजी असाईनमेंट शाळेमध्ये सादर करण्याच्या सूचना देत आहे असा खोटा संदेश लिहून तो वायरल केला जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत 10वी,12वीच्या विद्यार्थ्यांच्या यंदाच्या बोर्ड परीक्षेविषयक समस्या समोर येत आहेत आणि त्यावर विचार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ट्वीट
Beware! I've got to know that some morphed images of my twitter handle are being circulated to spread misinformation about exams. Only trust information from official handles and platforms. Please do not fall for any kind of misinformation. pic.twitter.com/VOjslleWAN
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 11, 2021
महाराष्ट्र सरकार कडून देखील यंदा 10वी,12वीच्या परीक्षांच्या वेळेस आरोग्य आणि सुरक्षा यांना प्राधान्य देऊनच पुढील निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे. सध्या महाराष्ट्रात यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली ते आठवी आणि 9वी व 11वी या सार्या इयत्तेमधील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करत वर्गोन्नती देण्याचा राज्य सरकारने निर्णय जाहीर केला आहे. मात्र अद्याप 10वी, 12वीच्या परीक्षांचा निर्णय प्रलंबित आहे. लवकरच त्याची देखील माहिती दिली जाणार आहे. पण तोपर्यंत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.