Meerut: भर रस्त्यात छेड काढणाऱ्या तरुणाला विद्यार्थिनीने दाखवला हिसका; दांडक्याने केली मारहाण, दोन जणांना अटक (Watch Video)
Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

स्त्री ही जितकी संवेदनशील असते, तितकीच गरज पडल्यास ती महिषासुरमर्दिनीचे रूपही धारण करू शकते, याचीच प्रचीती येणारे एक प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडले आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठ (Meerut) जिल्ह्यातील सदर बाजारात विद्यार्थिनींची छेडछाड करणे दोन तरुणांना खूप महागात पडले आहे. यावेळी मुलीने यातील एका तरुणाला पकडून दांडक्याने चांगलाच चोप दिला. एकीकडे मुलगा गयावया करत राहिला व दुसरीकडे मुलगी त्याला मारहाण करत राहिली. त्यानंतर तरुणांवर पोलिसांचा दंडाही पडला. आता या दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 12 मार्च 2021 रोजी काही तरुणांनी सदर बाजारात महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींची छेडछाड काढली. त्यानंतर मुलीचा मोबाईल क्रमांक विचारला. यावेळी चिडलेल्या तरुणीने त्या मुलाला पकडून बेदम मारहाण केली. या गोष्टीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर कॉन्स्टेबलच्या दंडुक्यानेही तरुणीने तरुणाला मारले. नंतर दोन्ही आरोपींना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. हा तरुण गेले 3-4 दिवस आपली छेद काढत असल्याचे तरुणीने सांगितले. अरुण कुमार व शुभम अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. (हेही वाचा: Chandigarh: बाळाला कडेवर घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या पोलीस महिलेला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा त्रिवार सलाम)

या विद्यार्थिनीने घटनेबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन्ही तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. प्रभारी पोलिस अधिकारी विजेंद्र राणा म्हणाले की, दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. आरोपींवर कारवाई केली जाईल. दरम्यान, सोशल मिडियावर या विद्यार्थिनीचे खूप कौतुक होत आहे. अनेकांनी प्रत्येक मुलीला आत्मसंरक्षणासाठी ट्रेनिंग द्यायला हवे असे म्हटले आहे.