कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी देशातील सर्व राज्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्याचे अनुसरण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. आजूबाजूची परिस्थिती पाहता लोक स्वतःहून काळजी घेत आहेत. दुसरीकडे, कोरोनापासून रक्षण करण्यासाठी अनेक धार्मिक कार्यक्रम होत असल्याचे, काही ठिकाणी पूजा, जादू टोना घडल्याचे प्रकारही कानी आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आगर मालवा (Malwa) जिल्ह्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याठिकाणी ग्रामस्थांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘मशाल दौड’चे आयोजन केले होते. 'भाग कोरोना भाग' अशी आरोळी देत मोठ्या संख्येने तरुण मशाल घेऊन धावत होते.
आगर जिल्ह्यातील गणेशपुरा (Ganeshpura) गावात रात्रीच्या अंधारातील कोरोना पळवून लावण्याचा लोकांचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. गावातून कोणताही साथीचा रोग काढून टाकण्याची ही जुनी तरकीब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लोकांना विश्वास आहे की ही युक्ती, कोरोनाला आपल्या गावातून पळवून लावू शकते. गावकऱ्यांनी सांगितले की ही गोष्ट त्यांच्या वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांना सांगितली आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा गावात एखादा साथीचा रोग येतो, तेव्हा तेव्हा लोक त्याचे नाव घेऊन रविवार आणि बुधवारी रात्री मशाल घेऊन पळत असतात. त्यानंतर मशाल गावच्या बाहेर निर्जन ठिकाणी टाकण्यात येते.
(हेही वाचा: कोरोना रुग्णांना ऑक्सीजन पोहोचवण्यासाठी पठ्ठ्याने विकली 22 लाखांची Ford Endeavour कार; शाहनवाज शेख बनले Oxygen Man)
गणेशपुरा येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणू हा देखील एक साथीचा रोग आहे. त्यामुळे त्याला पळवून लावण्यासाठी गावकऱ्यांनी ही युक्ती योजली. रविवारी रात्री 11 नंतर गावातील काही तरुण हातात मशाल घेऊन घराबाहेर पडले आणि 'भाग कोरोना भाग' अशा आरोळ्या ठोकत गावातून पळू लागले. दरम्यान, आपल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे गणेशपुरा येथील लोकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत गावातील बर्याच लोकांना ताप आला असून इतरही लक्षणे दिसू लागली आहेत. काही लोक मरण पावले आहेत. म्हणूनच सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे ही युक्ती योजण्याचा निर्णय घेतला. आता या अंधश्रद्धेच्या दौडीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.