पुणे (Pune ) शहरातील कात्रच चौकात (Katraj Chowk ) झळकलेल्या बॅनरची शहरासह प्रसारमाध्यमांमध्येही जोरदार चर्चा आहे. कात्रज चौकात असलेल्या एका खासगी इमारतीवर जवळपास 20 X 50 इतक्या साईजचा एक भलामोठा बॅनर झळकला आहे. या बॅनरवर 'कात्रजचा खून झाला..!' (Katraj was killed!) असे वाक्य आहे. याशिवाय काळ्या रंगाच्या बॅनरवर पांढऱ्या आणि लाल लंगात असलेली ही अक्षरे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. अर्थात, पोलीस आणि महापालिकेने आता हा बॅनर हटविल्याचे समजते. महत्त्वाचे म्हणजे या फ्लेक्सवर रक्ताने माखलेला चाकू धरलेला हात आणि रक्ताचे थेंबही दिसत आहेत. त्यामुळे हा कुठला जाहीरातीचा प्रकार आहे की कोणी विकृताने काही संदेश दिला आहे, अशी भीतीयूक्त उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
पुणे शहराला कला आणि कल्पकतेची कमी नाही. त्यामुळे पुणेकर नेहमी छोट्यामोठ्या गोष्टीत कल्पकता शोधतात. मग एखादा प्रेमवीर आपल्या प्रेयसीच्या नावाने तिला जाहीर साद घालतो किंवा मग एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणी कल्पकता वापरतो. त्यातून मग ‘शिवडे आय लव्ह यु’ आणि 'सविता भाभी तू इथंच थांब' यासारखे फ्लेक्स झळकतात. कधी मधी रस्तेही या कल्पकतेने माखून जातात. त्यामुळे पुणेकरांना अशा हटके बॅनरची सवय आहे. परंतू, 'कात्रजचा खून झाला..!' यासारख्या विचित्र बॅनरची मात्र पुणेकरांना सवय नाही. त्यामुळे सहाजिकच पुणेकरांमध्ये चर्चा नाही झाली तरच नवल. (हेही वाचा, ‘सविता भाभी… तू इथंच थांब’, पुणे येथील होर्डिंग्जमागे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’)
धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा बॅनर झळकला आहे. त्यामुळे हा बॅनर झळकण्यामागे काही राजकीय अर्थ अथवा हात आहे का? हे शोधले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पाठिमागी आठवड्यातच येथील एका उड्डाणपूलाचे उद्घाटन झाले होते. पुण्यातील रस्ते आणि विकास यावरुन कात्रज परिसरात जोरदार राजकीय शह काटशाह सुरु असतात. त्यामुळे या बॅनरमागे काही राजकीय अर्थ आहे का? याबाबतही उत्सुकता आहे. बाकी काही असले तरी 'कात्रजचा खून झाला' हे बॅनर मात्र सर्वांच्या नजरा खेचून घेत होते.