Jhansi Shocker: गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमधून साप बाहेर पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. मात्र आता चालत्या ट्रेनमध्ये सर्पदंश झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. झाशीहून दिल्लीला जाणाऱ्या एका व्यक्तीला चालत्या ट्रेनमध्ये साप चावला. त्या व्यक्तीला साप चावताच ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाइनवर फोन करून घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर प्रवाशाला आरपीएफने ग्वाल्हेर स्टेशनवर रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, टिकमगड येथील रहिवासी भगवानदास दिल्लीला जाण्यासाठी खजुराहो झांसी ट्रेनने झाशी स्टेशनवर पोहोचले होते. यानंतर ते येथून दिल्लीला जाण्यासाठी दादर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात चढले. ट्रेनमध्ये मोठी गर्दी असल्याने ते दरवाजाच्या मागे उभे राहिले. यानंतर काही वेळातच डबरा ते ग्वाल्हेर दरम्यान ट्रेन धावत असताना त्याला साप चावला. साप चावल्यानंतर त्यांनी जोरात आरडाओरडा केला, डब्यात साप असल्याची माहिती प्रवाशांना मिळताच ट्रेनमध्ये चेंगराचेंगरी झाली.
यानंतर रेल्वेला माहिती देण्यात आली आणि प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत पीआरओचे म्हणणे आहे की, ट्रेनमध्ये साप बाहेर पडत नाहीत, काही बेशिस्त तत्वाने हे कृत्य केले आहे.