तबलावादक लच्छू महाराजांना गूगल डूडलद्वारा मानवंदना !
प्रसिद्ध तबला वादक लच्छू महाराज Photo credits : Google

प्रसिद्ध तबला वादक लच्छू महाराज यांच्या 74 व्या जयंती निमित्त गूगलने त्यांना खास मानवंदना दिली आहे. लच्छू महाराज यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1944 साली बनारसमध्ये झाला. लहानपणापासूनच लच्छू महाराजांना तबला वादनाचा छंद होता. बनारस घराण्याचे तबलावादक लच्छू महाराज त्यांच्या वादनकौशल्यासाठी विशेष लोकप्रिय होते.

गूगलने आज जयंतीनिमित्त खास डूडल शेअर करून त्यांच्या वादन क्षेत्रातील कार्याचा गौरव केला आहे. लच्छू महाराज हे बारा भावंडांपैकी चौथे होते. लच्छू महाराजांच्या वादनाने देशा- परदेशातील रसिकांवर तबला वादनाची भूरळ पडली आहे. संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, या परफॉर्मिंग आर्ट्सच्या सर्वोच्च पुरस्कारांनी लच्छू महाराजांना 1957 साली गौरवण्यात आले. तसेच पद्मश्री पुरस्कारासाठीही लच्छू महाराजांचे नाव पुढे आले होते मात्र त्यांनी तो स्विकारण्यास नकार दिला होता.

जुलै 2016 साली वयाच्या 72 व्या वर्षी लच्छू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. 200 वर्षांपूर्वी तबला वादनामधील एक प्रमुख प्रकार असलेल्या बनारस घराण्याच्या वादनामध्ये लच्छू महाराजांनी भरीव कामगिरी केली आहे.