मध्य प्रदेश: पाऊस थांबविण्यासाठी बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट; चंद्रावर पोहोचलेल्या विज्ञानवादी भारतातील धक्कादायक प्रकार
Frog Couple Divorce | (Photo Credits- YouTube)

Frog Couple Divorce Only after Two Months of Marriage: प्रचंड प्रगती करत भारताने चांद्रयान (Chandrayaan) मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी भारतीय समाजाच्या मनातून अंधश्रद्धा आणि विक्षिप्तपणा अद्यापही कमी झाला नाही. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात नुकताच असा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुसळधार पाऊस आणि महापूर यापासून भोपाळ (Bhopal Rain) शहराची सूटका व्हावी या उद्देशाने इथल्या लोकांनी चक्क एका बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट (Frog Couple Divorce) घडवून आणला आहे. होय, पाऊस पडावा यासाठी बेडकांचा विवाह (Frog Marriage) लाऊन देण्याची पूर्वंपार चालत आलेली अवैज्ञानिक प्रथा काही ठिकाणी आजही सुरु आहे. इथल्या मंडळींनी त्यात एक पाऊल पुढे टाकत चक्क बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट घडवून आणण्याचाच प्रताप केला. अर्थात कथीत घसस्फोटाबाबत संबंधीत बेडूक दाम्पत्यास याची कल्पना झाली आहे किंवा नाही त्या दोघांनाच (बेडूक-बेडकी) माहिती.

अत्यंत धक्कादायक आणि तितक्याच मजेशीर अशा या प्रकारबाबत आज तक आणि इंडिया टुडे या दोन संकेतस्थळांनी वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसाने ओढ दिली. त्यामुळे इथल्या लोकांनी वरुनराजा प्रसन्न व्हावा आणि पाऊस पडावा यासाठी दोन बेडकांचे लग्न लाऊन दिले. दरम्यान, या दोन्ही बेडकांची जोडी ही नर-मादी होती की दोन्हीही समलिंगी होते याबबत माहिती मिळू शकली नाही. हा बेडूक विवाह 19 जुलै 2019 रोजी पार पडला. हा विवाह लावताना लोकांची धारणा होती की, या विवाहामुळे इंद्रदेव प्रसन्न होतील आणि मुसळधार पाऊस कोसळेन.

विशेष म्हणजे योगायोग असा की, मध्य प्रदेश राज्यातील काही ठिकाणी खरोखरच मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे बेडकाचे लग्न लाऊन देणाऱ्या या अतिउत्साही मंडळींचा विश्वास अधिकच घट्ट झाला. दरम्यान, मुसळधार पावसाची संततधार बराच काळ सुरुच होती. इतकी की, अनेक ठिकाणी महापूर आले. जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी तर एनडीआरएफ जवानांना पाचारण करावे लागले. प्राप्त आकडेवारीनुसार 11 सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या तुलनेत 26 टक्के अधिक पाऊस झाला. मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ शहरात तर पावसाने गेल्या 13 वर्षांचा विक्रम मोडीत काढला. त्यामुळे या लोकांची धारणा अशी झाली की, बेडुक विवाहामुळे इंद्रदेव काहीसे अधिकच खूश झाले असावेत. यातून या लोकांच्या मनात भावना निर्माण झाली की, आता या बेडूक दाम्पत्याचा घटस्फोट घडवून आणावा. त्यामुळे कदाचित पाऊस कमी होईल आणि पूरस्थितीपासून आपली सुटका होईल.

भोपाळमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा 45 टक्के अधिक पाऊस पडल्याच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे भोपाळनजिकच्या कलियासोत आणि भदभदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेआहे. ती वर्षांपूर्वीही मुसळधार पाऊस पडल्याने अशाच प्रकारे धरणाचे दवाजे उघडण्यात आले होते. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमिवर हवामान विभागाने मध्य प्रदेशातील 32 ते 38 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (हेही वाचा, लग्न मजेशीर बनवण्यासाठी गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा आणि पुढे झाले असे की...)

दरम्यान, मुसळधार पावासापासून सुटका करुन घेण्यासाठी नागरिकांना पुन्हा एकदा परमेश्वराची आठवण आली. इंद्रपुरी परिसरातील ओम शिव सेवा शक्ती मंडळ सदस्यांनी बुधवारी संध्याकाळी प्रतिक्रात्मक रुपात बेडूक आणि बेडकीनीचा घटस्फोट घडवून आणला. विशेष म्हणजे या वेळी मंत्रपठणही करण्यात आले. तसेच, विधिवतपणे या बेडूक दाम्पत्याला घसस्फोटाद्वारे विभक्त करण्यात आले. ओम शिव सेवा शक्ती मंडळ सदस्यांची अशी धारणा आहे की, बेडुक आणि बेडकीनीचा विवाह लावून दिल्यामुळेच मध्यप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडला. आता या दाम्पत्याचा घटस्फोट झाल्याने पाऊस कमी होईल, असे या मंडळींना वाटते.