Representational Image (Photo Credits: Pixabay/ Twitter)

जगभरात कोरोना विषाणूने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. या काळात जवळजवळ सर्वांनाच आर्थिक समस्येचा सामना करावा लागला आहे. लॉक डाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कंपन्या-उद्योगधंदे बंद पडले. यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. मात्र या दरम्यान काही चांगल्या गोष्टीही लोकांच्या समोर येत आहेत. या काळात लोक एकमेकांना मदत करायला पुढे सरसावले आहेत. नुकतेच फास्ट फूड कंपनी बर्गर किंगच्या (Burger King) एका पोस्टमुळे जगात माणुसकी अजूनही शिल्लक असल्याची पुन्हा एकदा प्रचीती आली. बर्गर किंगने एका पोस्टद्वारे आपल्या ग्राहकांना मॅकडोनल्ड्सकडूनही (McDonald’s) गोष्टी विकत घेण्याचे आवाहन केले आहे.

क्षेत्र कोणतेही असो, प्रतिस्पर्धी कंपन्या नेहमीच एकमेकांना टक्कर देताना दिसत आहेत. मात्र आता बर्गर किंगने एक अनोखे उदाहरण जगासमोर ठेवले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर बर्गर किंगचे कौतुक केले जात आहे. प्रसिद्ध रेस्टॉरंट चेन बर्गर किंगच्या युके येथील युनिटने ग्राहकांना या कोरोना विषाणूच्या संकटाच्या वेळी आपल्या प्रतिस्पर्धी रेस्टॉरंट्सकडूनही ऑर्डर घेण्यास सांगितले आहे. बर्गर किंगने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मॅकडोनल्ड्सकडून ऑर्डर घ्या. आम्ही असे काही करू असा कधीही विचार केला नव्हता. परंतु हजारो कर्मचाऱ्यांना काम देणाऱ्या रेस्टॉरंटला यावेळी खरोखर आपल्या सपोर्टची आवश्यकता आहे.’ (हेही वाचा: हॉटेल, रेस्टॉरंट, फूड स्टॉल आणि घरी बनवलेल्या खाद्य विक्रेत्यांकडे FSSAI परवाना असणे अनिवार्य? जाणून घ्या सत्यता)

‘यासोबतच KFC, Subway, Domino's Pizza, Pizza Hut, Five Guys, Greggs, Taco Bell, Papa John's, Leon.. अशा इतर अनेक चेन्सकडूनही ऑर्डर करा. होम डिलिव्हरी, टेक-अवे किंवा ड्राईव्ह-थ्रूद्वारे तुम्ही स्वतःला रुचकर जेवणाचा आनंद देऊ शकता. व्हूपर हे उत्तम आहेच, परंतु बिग मॅक ऑर्डर करणे ही देखील वाईट गोष्ट नाही.’ कोरोना विषाणूमुळे सर्व रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसाय काही महिने पूर्णतः बंद होते. यामुळे कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता बर्गर किंगने या पोस्टद्वारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांनाही थोडी मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.