केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आलेली माहिती (Photo Credit : Twitter)

देशात कोरोना विषाणूचा (Corona Virus) शिरकाव होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. बघता बघता या विषाणूमुळे संक्रमित झालेल्या लोकांची संख्या 81 वर पोहचली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. अशात सध्या सोशल मिडीयावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुट्ट्यांबद्दल माहिती दिली आहे. हे परिपत्रक केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आल्याचे भासवले जात आहे. मात्र हे परिपत्रक खोटे असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

हे व्हायरल होत असलेले केंद्र सरकारचे परिपत्रक सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे आहे असे सांगितले जात आहे. केंद्राच्या या सूचना महाराष्ट्र, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी लागू आहेत असेही यात सांगण्यात आले आहे. मात्र आता जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणुला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत, समाज माध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. (हेही वाचा: एअर इंडियाकडून फ्रान्स, इटली, जर्मनीसह अन्य देशांची उड्डाणे 30 एप्रिल पर्यंत रद्द)

केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.