Google Doodle | (ANI)

बर्लिनची भिंत पडण्याच्या ऐतिहासिक घटनेला आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त गुगल कडून खास डूडल तयार करण्यात आले आहे. बर्लिनची भिंत ही जर्मनीतील या शहराचे विभाजन करण्यासाठी बांधण्यात आलेली काँक्रीटची भिंत होती. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर पराभूत झालेल्या नाझी जर्मनीचे पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये दुभाजन करण्यात आले. यादरम्यानच नाझी जर्मनीची राजधानी बर्लिनचे देखील पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले.

पूर्व जर्मनी मध्ये कम्युनिस्ट लोकांचे प्रमाण अधिक होते. या कम्युनिस्ट राजवटीनेच 1961 साली पश्चिम जर्मनीला वेढून टाकणारी ही भिंत बांधली. पूर्व जर्मनी मधून होणारे जर्मन नागरिकांचे पलायन थांबवणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. बर्लिनची ही भिंत बांधण्यापूर्वी दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरपासून म्हणजे 1945 ते 1961 पर्यंत सुमारे 35 लाख नागरिकांनी पूर्व जर्मनी मधून पश्चिम जर्मनी मध्ये पलायन केलं होतं. या भिंतीनंतर मात्र हे पलायन जवाजवळ संपुष्टात आलं. (हेही वाचा. Google चा २१ वा वर्धापन दिन: 1998 चा 'Throwback' फोटोच्या माध्यमातून गूगलने साकारले बर्थ डे स्पेशल गूगल डुडल)

त्यानंतर अठ्ठावीस वर्षांनी 9 ऑक्टोबर 1989 ला पूर्व आणि पश्चिम जर्मनी मधील करारानुसार नागरिकांना सीमा ओलांडून जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती भिंत पाडण्यात आली. 1990 मध्ये झालेल्या दोन्ही देशांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये या घटनेचा मोलाचा वाटा आहे.

या दिवसाचं औचित्य साधून बनवलेल्या गूगल डूडल मध्ये एक सिमेंटची भिंत पाडल्याचे दाखवून त्या पडलेल्या अवशेषांवर दोन बाजूंकडील दोन जण एकमेकांना घट्ट मिठी मारताना दाखवले आहेत. दोन्ही देशांतील नागरिकांची त्या भिंतीकडे पाहण्याची भावना त्यामुळे त्वरित लक्षात येते.