मराठी मातीचा, मराठी भाषेचा डंका विविध कारणांनी साऱ्या जगात वाजत असतो. अनेक मराठी लोकांनी आपल्या कर्तुत्वाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आता यामध्ये भर पडत आहे ते बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील 68 वर्षीय मराठी आज्जीबाईंची. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील 68 वर्षीय आजीबाई चक्क सायकलीने वैष्णो देवीच्या (Vaishno Devi) दर्शनासाठी निघाल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या आजीबाईंच्या हिमतीचे कौतुक केले आहे.
रतन शारदा नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे- ‘एक 68 वर्षीय मराठी महिला एकटी सायकलवरून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात आहे. खामगावपासून 2200 किमी अंतर... मदर पॉवर.’ व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती वैष्णोदेवीच्या अंतराचा अंदाज व्यक्त करत, 1700, 1800 किमी अंतर असेल असे म्हणतो, तेव्हढ्यात मोठ्या कराऱ्या आवाजात आजीबाई हे अंतर 2200 किमी असल्याचे सांगतात. व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला या आजीबाई एकट्या असल्याचे फारच आश्चर्य वाटते.
A 68 year old Marathi lady is going to Vaishnodevi on her own, alone, by geared cycle. 2200 km from Khamgaon. Mother's power 🙏💐😇 #MatruShakti pic.twitter.com/TcoOnda2Zg
— Ratan Sharda 🇮🇳 (@RatanSharda55) October 19, 2020
महत्वाचे म्हणजे या आजीबाईंचे शेवटचे वाक्य प्रत्येक मराठी माणसाचा अभिमाने ऊर भरून येईल असे आहे. शेवटी त्या म्हणतात, ‘अहो आपल्या मराठी माणसाने, मुख्यत्वे एकट्या महिलेने कधीतरी असे धाडस करावेच लागेल.’ त्यानंतर व्हिडिओ शूट करणरे लोक या आजीबाईंना पाणी देतात व त्यानंतर आजीबाई आपल्या पुढच्या प्रवासाला निघतात. आता सोशल मीडियावर लोक या 68 वर्षीय महिलेच्या धैर्याचे कौतुक करीत आहेत. बरेच लोक या महिलेला शुभेच्छा देत त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून प्रार्थना करताना दिसत आहेत.