चिमुकलीवरील उपचारासाठी बाहुलीलाही प्लास्टर; दिल्ली येथील लोकनायक रुग्णालयातील डॉक्टरांची शक्कल; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Little girl with her doll (Photo Credits: Twitter/ANI)

राजधानी दिल्ली (Delhi) येथील लोकनायक रुग्णालयात ( Lok Nayak Hospital) उपचारासाठी दाखल असलेल्या एका चिमुकली आणि तिच्या बाहुलीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमगची कहानीही तितकीच हृदयस्पर्शी आहे. या फोटोत एक चिमुकली आणि बाहुली दिसते. या दोघींच्याही पायाला प्लास्टर आहे. आणि त्यांचे पाय हवेत लटकले आहेत. प्राप्त माहितीनुसार ही चिमुकली केवळ 11 महिन्यांची असल्याचे समजते. या चिमुकल्या मुलीचे नाव जिक्रा मलिक (Zikra Malik) असे आहे. खेळत असताना जिक्रा जमीनीवर पडली आणि तिला गंभीर जखम झाली. ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी जिक्रा हिच्या पायाला प्लास्टर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पालकांनीही त्याला संमती दिली. मात्र, जिक्राचा विरोध पाहता तिच्या पायाला प्लास्टर करणे हे डॉक्टरांसाठी एक आव्हान होते.

जिक्रा हिच्या पायाला प्लास्टर कसे करायचे? याबाबत डॉक्टर चिंतीत होते. दरम्यान, तिच्या पालक आणि नातेवाईकांकडून डॉक्टरांना समजले की, जिक्रा हिस बाहुली प्रचंड आवडते. हिच बाब डॉक्टरांनी ध्यानात घेतली. जिक्राची आवडती बाहुली रुग्णालयात आणली. पहिल्यांदा त्या बाहुलीला प्लास्टर करण्यात आले. बाहुलीला प्लास्टर केल्याचे पाहताच जिक्रा हिला प्रचंड आनंद झाला. त्यानंतर जिक्रा पायाला प्लास्टर करुन घेण्यास स्वत:हूनच तयार झाली. (हेही वाचा, धक्कादायक! शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पोटातून निघाले तीन किलो लोखंड; सहा महिन्यांपासून खात होता नटबोल्ट्स, खिळे, चमचे आणि पिन्स)

एएनआय ट्विट

प्राप्त माहितीनुसार, लोकनायक हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक ब्लॉक बेड क्रमांक 16 वर जिक्रा आणि बाहुली दोघीही पायाला प्लास्टर लावलेल्या अवस्थेत दिसत होत्या. हा फोटो व्हायरल होता जिक्रा केवळ हॉस्पिटलमध्येच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झाली आहे. या प्रसिद्धीमुळे जिक्राची ओळख वेगळ्याच नावात बदलली आहे. हॉस्पिटलमध्ये आता सगळे लोक तिला बाहुलीवाली मुलगी नावाने ओळखू लागले आहेत.