गेल्या 115 वर्षांपासून धौलपुरच्या (Dholpur) महाराणा शाळेच्या (Maharana School) तीन खोल्या बंद होत्या. याबाबत कर्मचार्यांकडे विचारणा केली असता, या खोल्यांमध्ये रद्दी किंवा नको असलेले समान आहे असे सांगण्यात येत होते. मात्र आता या तीनही खोल्यांचे दरवाजे उघडले आहेत. या खोल्यांमध्ये दुर्मिळ अशी ग्रंथ संपदा असल्याचे समोर आले आहे. गेल्या 115 वर्षांपासून, महाराणा शाळेच्या दोन ते तीन खोल्यांमध्ये एक लाख पुस्तके बंद होती. ही सर्व पुस्तके 1905 पूर्वीची आहेत. असे सांगितले जात आहे की, धौलपुरच्या महाराज उदयभानु यांना दुर्मिळ पुस्तकांची आवड होती. त्यांनीच हा दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह केला होता.
ब्रिटिश काळात महाराज उदयभानु सिंह जेव्हा केव्हा लंडन आणि युरोपमध्ये जायचे, तेव्हा ते आपल्यासोबत पुस्तके घेऊन परत यायचे. या पुस्तकांमध्ये अशी अनेक पुस्तके आहेत, ज्यात शाईऐवजी सोन्याचे पाणी वापरले आहे. 1905 मध्ये या पुस्तकांच्या किंमती 25 ते 65 रुपयांच्या दरम्यान होत्या. त्यावेळी सोन्याचा दर 27 रुपये तोळा होता. आता बाजारात या पुस्तकांची किंमत लाखो रुपये सांगितली जात आहे. सर्व पुस्तके भारत, लंडन आणि युरोपमध्ये छापली गेली आहेत, यामध्ये 3 फुटांचे एक पुस्तक आहे ज्यात संपूर्ण जगाचे आणि देशांचे नकाशे नकाशे छापले आहेत. अरबी, पर्शियन, उर्दू आणि हिंदी भाषेतील पांडूलिपीचाही या पुस्तकांमध्ये समावेश आहे. (हेही वाचा: कुबेराचे वरदान, लक्ष्मीचे लोटांगण; पाहा भारतात श्रीमंतांची संपत्ती किती वाढली? भुकेला गरीब कर्जाच्या विळख्यात)
115 वर्षांमध्ये शाळेत बरेच कर्मचारी बदलले, परंतु कोणीही बंद खोल्या उघडल्या नाहीत. जेव्हा या खोल्या स्वच्छतेसाठी उघडल्या गेल्या, तेव्हा तीन खोल्यांमध्ये भरलेली पुस्तके पाहून, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भविष्यात या पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना खूप महत्वाची माहिती मिळेल. दरम्यान, धौलपूर हे राजस्थानमधील एक लहान शहर आहे, जे धौलपूर जिल्ह्यात येते. धौलपूर विशेषत: इथल्या खास दगडांसाठी प्रसिद्ध आहे. राणा उदयभानु सिंह हे 1911 ते 1949 या काळात इथल्या संस्थानचे राजे होते.