Aaditya Thackeray | Photo Credits: Facebook

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचं सावट अजूनही घोंघावत असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं, शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार किंवा कोणत्याही शालेय उपक्रमांचा निर्णय हा आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं नमूद करत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहले आहे. कोविड 19 च्या संकटातही अनेक विद्यापीठांचा परीक्षा घेण्याचा हट्ट आहे. प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय होत आहे हे धोक्याचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच यंदाचं शैक्षणिक वर्ष जून/ जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून सुरू करण्याबाबतही विचार केला जावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी पत्राद्वारा केली आहे.

दरम्यान जगभरात जिथे जिथे कोरोना संकटात मध्येच शाळा सुरू झाल्या तिथे कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शिक्षणाबाबत निर्णय घेताना सावध भूमिका घ्यावी यामध्ये प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष देण्याकडे भर द्यावा असे आवाहन देखील त्यांनी पत्राद्वारे केले आहे. MHT CET 2020 Exam: सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली महाराष्ट्रातील सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका

भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे. यामध्ये परीक्षा एका दिवसाची असली तरीही त्याचा धोका परीक्षार्थ्यांसोबतच त्यांच्या घरात राहणार्‍या वृद्ध आजी-आजोबांकडे पसरण्याकडे आहे. त्यामुळे भविष्यात कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ होऊ नये या अनुषंगाने तुम्ही हस्तक्षेप करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.

महाराष्ट्रात सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा याचिकेला आज सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आले आहे. तर नीट, जेईई सारख्या परीक्षा देखील महाराष्ट्रासह देशभर घेतल्या जाणार आहे. दरम्यान युवासेना कडून सर्वोच्च न्यायालयात युजीसीच्या गाईडलाईंसदेखील सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याचा अंतिम निकाल देखील प्रतिक्षेत आहे.