मारहाण । प्रतिकात्मक फोटो । (Photo Credits: IANS)

Pune Shocker: पुण्यातील बाणेर हिल (Baner Hill) येथे फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर आणि त्याच्या मैत्रिणीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढचं नाही तर या जोडप्याकडील 51,000 हजार किमतीच्या मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. औंध येथील रहिवासी अबिनू चवांग यांनी याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, अबिनू आणि त्यांची मैत्रिण चिंगमालिउ पामेई हे बाणेर हील येथे चालत असताना त्यांना 18 ते 20 वयोगटातील चार तरुणांनी अडवले. धारदार शस्त्रांनी सज्ज असलेल्या हल्लेखोरांनी दोघांना धमकावून त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांपैकी एकाने चिंगमालिउ यांच्या बोटावर शस्त्राने वार केले. त्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी या टोळक्याने त्यांचे मोबाईल फोन, इअर बड्स आणि इतर वैयक्तिक वस्तू लुटल्या. (हेही वाचा - Pune Sexual Assault Case: पुण्यात 4 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, शेजाऱ्याने केले घृणास्पद कृत्य, गुन्हा दाखल)

या प्राणघातक हल्ल्यानंतर घाबरलेल्या पीडितांनी चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन गाठले, तेथे रात्री उशिरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौगुले सध्या या घटनेचा तपास करत आहेत. (हेही वाचा - Wanowrie Sexual Assault Case: पुण्याच्या वानवडी भागात दोन अल्पवयीन मुलींवर बस ड्रायव्हर कडून लैंगिक अत्याचार)

बाणेर हिल येथे अलीकडच्या काळात घडलेली ही दुसरी घटना आहे. दहा दिवसांपूर्वी याच परिसरात नागालँडमधील एका विद्यार्थ्याला अशाच प्रकारे मारहाण करून लुटण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच काही अल्पवयीन आरोपींना आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे.

तथापी, 3 ऑक्टोबर रोजी पुण्यातील बोपदेव घाटात एका महाविद्यालयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील डोंगराळ भागांसह, निर्जन भागात प्रकाशझोत बसवण्यासाठी निधीची तरतूद करण्याची घोषणा केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही पुढील गुन्हे रोखण्यासाठी या भागात गस्त वाढविण्याचे आदेश दिले आहेत.