Representational Image | (Photo Credits: PTI)

प्रेमसंबधांना विरोध केला म्हणून एका तरुणाने प्रेयसीच्या आजी आणि लहान भावाची हत्या (Murder) केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने स्वत: मानकापूर रेल्वे रुळावर आत्महत्या (Suicide) केली. ही घटना नागपूर (Nagpur) येथील हजारी पहाड (Hazari Pahad) येथे घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. आरोपी मुलाची इंस्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर यांच्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र, विरोध दर्शवला म्हणून त्याने प्रेयसीच्या आजी आणि भावाची हत्या केली आहे.

लक्ष्मीबाई धुर्वे (वय, 70) आणि यश मोहन धुर्वे (वय, 10) अशी मृतकांची नावे आहेत. लक्ष्मीबाईंची 20 वर्षीय नात आणि 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. या दोघांची ‘इन्स्टाग्राम’वरून ओळख झाल्याचे कळते. दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो केले. त्यानंतर दोघांची ओळख वाढली आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध जुळले, असे सांगितले जात आहे. आरोपी हा तरुणीपेक्षा वयाने लहान होता. तसेच अन्य विविध कारणांमुळे तरुणाच्या कुटुंबीयांचा या प्रेम संबंधांना विरोध होता. काही दिवसांपूर्वी याबाबत त्यांच्यात एक बैठक झाली. त्यानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र, त्यानंतरही आरोपीने तिला फोन करणे सुरुच ठेवले. दरम्यान, समोरुन कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो चिडला. त्यानंतर तो तिचा शोध घेण्यासाठी तिच्या घरी गेला. त्यावेळी तिची आजी लक्ष्मीबाई आणि लहान भाऊ मोहन यांच्यात वाद झाला. याच वादातून त्याने चाकू भोकसून हत्या केली आणि तिथून फरार झाला. हे देखील वाचा- Thane: आईसह 3 मुलांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत, वडीलांचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2. 30 च्या सुमारास त्याने आजी व नातवाची हत्या केली. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास रेल्वे रुळावर आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तो आपल्या एका मित्राशी फोनवर बोलला. ‘सब खतम हो गया, मै जान दे रहा हू,’ हे त्याचे शेवटचे शब्द होते. दरम्यान, त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.