
पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेपाठोपाठ (पीएमसी) आर्थिक संकटात असणाऱ्या येस बँकेला (YES Bank Crisis) घरघर लागली आहे. रिझव्र्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातले असून, बँकेच्या खातेदारांना महिन्याभरासाठी 50 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. यामुळे बॅंकेच्या खातेदारांची पैसे काढण्यासाठी धावधाव सुरु आहे. यातच नेट बँकिंग, मोबाइल ऍप, डेबिट आणि क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि एटीएम सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हेतर गुगल पे, फोन पे सारखी इतर मोबाइल वॉलेट्स आणि इतर बँकेच्या एटीएम मधून येस बँक आर्थिक व्यवहार करता येत नसल्याने खातेदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच येस बॅंकेतील खातेदारांचे पैसे बुडणार नाहीत, असे आश्वासन अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी दिले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार येस बँकेचे खातेदार महिनाभरात एकदाच 50 हजारांपर्यंत रक्कम काढू शकतात. त्यामुळे देशभरातील येस बँकेच्या शाखांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी जमली आहे. मुंबईत देखील शाखांमध्ये ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, 2 दिवसांपासून बँकेची नेट बँकिंग, मोबाइल ऍप, डेबिट आणि क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि एटीम सेवा पूर्णपणे खंडीत आहे. येस मोबाइल ऍप डाऊनलोड होत नसल्याने खातेदार हैराण झाले आहेत. त्यामुळे खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना अधिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे देखील वाचा- PMC Bank Crises: ईडीकडून HDILचे संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांच्या खाजगी वाहनांवर जप्ती
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या वरळीतील 'समुद्र महल' घरावर ईडीने शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकला. राणा कपूर यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच राणा कपूर यांच्याविरोधात लूक आऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे कपूर यांना देश सोडून जाता येणार नाही. राणा कपूर यांच्यावर डीएचएलएफला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
राणा कपूर यांच्यावर डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. येस बँकेने डीएचएलएफ ला 3600 कोटींचे कर्ज दिले होते. राणा कपूर यांनी येस बँकेद्वारे आपल्या अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केले आहे. कपूर यांनी आपल्या वैयक्तिक संबंधातून हे कर्ज वाटप केल्याचेही उघडकीस आले आहे.