Yawal Nagar Parishad Election 2020: यावल नगरपरिषद नगराध्यक्षपद निवडणूक जाहीर; नौशाद मुबारक तडवी यांना संधी, प्रतीस्पर्धीच नाही
Delhi Assembly Elections 2020 (Photo Credits: ANI)

Yawal Municipal Council Mayoral Election 2020: यावल नगरपरिषद (Yawal Nagar Parishad) नगराध्यक्षपद निवडणूक जाहीर झाली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एक प्रमुख महापालिका अशी ओळख असलेल्या या महापालिकेसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे या वेळचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिला राखीव आहे. या पदासाठी येत्या 14 जुलै या दिवशी निवडणूक पार पडत आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडले आहे. सध्यास्थितीला पालिकेत एकूण नगरसेवकांपैकी नौशाद मुबारक तडवी (Naushad Mubarak Tadvi) या एकमेव अनुसूचित जमाती महिला सदस्य आहेत. त्यामुळे नौशाद मुबारक तडवी यांची नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड होणार हे निश्चित मानले जात आहे.

उल्लेखनीय असे की, राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकासआघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नगराध्यक्ष व सरपंच पदाची निवड लोकनियुक्त पद्धतीने (थेट जनतेतून) करणे रद्दबादल केले आहे. त्यामुळे यावल नगरपरिषद नगराध्यक्ष हा नगरसेवकांमधून निवडला जाणार आहे. त्यामुळे या वेळी पक्षी राजकारण आणि नगरसेवकाच्या मताला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.

यावल नगरपालिका नगराध्यक्षपद निवडणूक कार्यक्रम

अर्ज दाखल करणे 6 ते 7 जुलै सकाळी 11ते दुपारी 2 पर्यंत
अर्जाची छाननी 7 जुलै दुपारी 2 वाजेनंतर
अपील दाखल करणे 8 ते 10 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत
वैध अर्ज यादी प्रसिद्ध 10 जुलै सायंकाळी 5 वाजेनंतर
उमेदवारी मागे घेणे 13 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत
निवडणूक सभा 14 जुलै सकाळी 11 वाजता
पीठासीन अधिकारी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले

नौशाद मुबारक तडवी यांना संधी, प्रतीस्पर्धीच नाही

मजेशीर असे की, या वेळी नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडले आहे. पालिकेत एकूण नगरसेवकांपैकी केवळ नौशाद मुबारक तडवी या एकमेव अनुसूचित जमाती महिला सदस्य आहेत. त्यामुळे नौशाद मुबारक तडवी यांची नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड होणार हे निश्चित आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेल्या तडवी यांना विरोधी पक्ष अधवा अपक्ष म्हणून आव्हान देण्यासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे तडवी यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच बाकी आहे. (हेही वाचा, Maharashtra ZP Election Results 2020: जिल्हा परिषद निवडणूक निकाल फक्त एका क्लिकवर; पाहा पालघर, धुळे, वाशिम,अकोला, नंदुरबार, नागपूर येथे कोणी मारली बाजी)

दरम्यान, या आधी शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी निवडून आल्या होत्या. मात्र, सुरेखा कोळी यांचे अनुसूचित जमातीचे वैध जात प्रमाणपत्र विविहत मुदतीत सादर झाले नाही. त्यामुळे पालिका मुख्याधिकाऱ्यांनी त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. याच काळात माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी सुरेखा कोळी यांचेविरुद्ध जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ठाकणे यांनी या अर्जाची दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना पदावरून पदच्युत केले व अपात्र घोषीत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा आदेश 28 नोव्हेंबर 2019ला काढला. दरम्यान सुरेखा कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देत राज्याच्या नगरविकास विभागाकडे आपील करुन दाद मागितली. मात्र नगरविकास विभागाने त्यांचे आपील फेटाळून लावले आणि नगराध्यक्षपद अपात्र ठरवले.