ST Bus Accident Yavatmal: एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात; 4 ठार, 13 गंभीर जखमी; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
Accident | Representational Image (Photo Credits: Pixabay)

अमरावती-यवतमाळ (Amravati-Yavatmal Route) मार्गावर असलेल्या नेर (Taluka Ner District Yavatmal ) जवळील लोणी गावानजिक झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर 13 जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (4 डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडली. एसटी बस (ST Bus Accident) आणि टियागो कार (Tata Tiago Accident) कार यांच्यात झालेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात घडला. अपघात इतका भयावह होता की, तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु असून, जखमींना नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसटी बस ( क्रमांक, एमएच 06 एस 8826) अमरावतीवरून यवतमाळला निघाली होती. ही बस आणि समोरुन येणारी टीयगो कार (क्रमांक, एमएच 29 बीसी 9173) यांच्यात समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहने एकमेकांवर समोरासमोर आदळली. त्यामुळे अपघाताची भीषणता वाढली. अपघाता घडला तेव्हा वाहनांच्या धडकेमुळे मोठा आवाज झाला. आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. तसेच पोलिसांनाही सदर घटनेची माहिती दिली. (हेही वाचा, Accident on Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; कार व ट्रकच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू)

दरम्यान, अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये राधेश्याम इंगोले (रा. यवतमाळ ), रजनी इंगोले (रा. यवतमाळ ), वैष्णवी गावंडे ( रा. वाशिम) आणि सारीका चौधरी ( रा. पुसद यवतमाळ) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये साक्षी प्रमोद चौधरी ( रा. पुसद ), प्रमोद पांडुरंग चौधरी, सारीका संतोष गावंडे आणि संतोष गावडे यांचा समावेश आहे. इतर जखमींची नावे समजू शकली नाहीत.

स्थानिक नागरिकांनी समयसूचकता दाखवत तातडीने मदत व बचाव कार्य सुरु केले. त्यामुळे अनेक जखमींना नेर येथील रुग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर सर्वच जखमींना जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी घटना कशी घडली याबाबत चौकशी सुरु केली आहे.