Yashomati Thakur Vs Bacchu Kadu: निवडणूक झाली, निकाल लागले तरीही बुलढाणा जिल्ह्यात मात्र भूताचीच चर्चा
Yashomati Thakur Vs Bacchu Kadu | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नगरपंचायत, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्याचा निकालही कालच (19 जानेवारी) लागला. जनमत कोणाच्या बाजूने हेदेखील निकालामुळे स्पष्ट झाले. तरीही निवडणुकीच्या आधीपासून बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नेत्यांच्या भाषणातून अवतरलेले भूत अद्यापही कायम आहे. महिला व बालविकासमंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज्य मंत्री बच्चू यांनी पुन्हा एकदा या भूताचा उल्लेख केला आहे. बच्चू कडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

यशोमती ठाकूर विरुद्ध बच्चु कडू

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचेच डोळे लागले होते. दरम्यान, यात काही निकालांकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. संग्रामपूर नगर पंचायत निवडणूक त्यापैकीच एक. या ठिकाणी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पॅनल लावले होते. पॅनलच्या वतीने 17 उमेदवार रिंगणात होते. बुलढाणा जिल्ह्यात बच्चू कडू यांचे पॅनल पाहून सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. सहाजिकच प्रचारही तसाच झाला. कारण एकमेकांविरोधात प्रचारासाठी महाविकासआघाडी सरकारमधील दोन नेत मैदानात होते. एका बाजूला अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला राज्य मंत्री बच्चू. प्रचार एकदम काट्याचा झाला. (हेही वाचा, Nagar Panchayat Election 2022 Results: महाराष्ट्रातील 106 नगरपालिकांपैकी 97 पालिकांचे निकाल जाहीर, जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी)

काय आहे भूत प्रकरण?

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी निवडणूक प्रचारादरम्यान बच्चू कडू यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, "आज आमच्या जिल्ह्यातील भूत या ठिकाणी येणार आहे...!". आपल्यावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्याच दिवशी संध्याकाळी बच्चू कडू यांनी म्हटले की, "मी साधं सुध भूत नसून पंचमहाभूतातील एक भूत आहे, जे विकासाचं भूत आहे..!"

ट्विट

दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे पॅनल बहुमताने निवडूण आले. त्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून टीकेला प्रत्युत्तर देत बच्चू कडू यांनी म्हटले की, ''निवडणूकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले, जनतेने अनेक दिग्गजांना नाकारुन आम्हाला संधी दिल्या बद्दल धन्यवाद! भुत" लागल्या प्रमाणे विकास करावा हे आता आम्ही दाखवू'.