कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'एक दीर्घ श्वास' या प्रबोधन चित्रफितीचे यशोमती ठाकुर यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन
Yashomati Thakur (PC - Twitter)

कौटुंबिक हिंसाचार (Domestic Violence) विरोधात संदेश देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'एक दीर्घ श्वास' (Ek Dirgh Shwas) या प्रबोधन चित्रफितीचे महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले आहे. या चित्रफितीच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार विरोधी संदेश अधिक परिणामकारकपणे समाजातील सर्व स्तरांत पोहोचेल, असं मत यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशात तसेच राज्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊन काळात अनेक महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जाव लागत आहे. हिंसक विचार थांबवायचा असेल तर जीवनशैली आणि विचार करण्याची प्रक्रिया बदलण्याची गरज आहे. इतरांचा सन्मान व प्रतिष्ठा राखणे ही आपली जबाबदारी आहे. कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी रागावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे असल्याचेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - लॉकडाऊनमुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना मूळगावी जाण्यासाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा - अनिल परब)

'एक दीर्घ श्वास' या व्हिडिओच्या माध्यमातून राग आणि तणाव कसा दूर करता येईल यावर मार्ग सांगण्यात आला आहे. कुटुंबांतर्गत हिंसा थांबली तरच स्वस्थ आणि निरोगी समाज निर्माण होईल या भावनेतून अनेक रंगकर्मी व कलाकार या प्रबोधन चित्रफितीत सहभागी झाले आहेत. दरम्यान, मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावं लागणाऱ्या महिलांसाठी 100 नंबर जारी केला होता. या नंबरवर संपर्क साधून महिलांनी आपल्या तक्रारची नोंद करावी, असं आवाहन ठाकरे यांनी केलं होतं. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.