लॉकडाऊनमुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना मूळगावी जाण्यासाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा - अनिल परब
ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

लॉकडाऊनमुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एका बसमधून केवळ 22 जणांनाचं प्रवास करता येणार आहे. या बसच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आपल्या गावी सोडण्यात येणार आहे. ही सुविधा केवळ 17 मे पर्यंतचं असणार आहे.

दरम्यान, आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक मजूर, विद्यार्थी आणि नागरिक अडकून पडले आहेत. या सर्वांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या लोकांना गावी जायचे आहे त्यांनी 22 जणांची एक यादी तयार करावी. ही यादी पोलीस ठाण्यात द्यावी. तसेच गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी. यात मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायचे आहे? याबाबत माहिती द्यावी. 22 जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण सांगतील. प्रवासादरम्यान, प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वत: करायची आहे. विशेष म्हणजे नागरिकांकडून प्रवासाचे कोणतंही भाडे आकारण्यात येणार नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - देवेंद्र फडणवीस राज्याचे देणे लागत असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रासाठी केंद्राकडे निधी मगावा: संजय राऊत)

सोमवारपासून सुरू करण्यात येणाऱ्या या एसटी सुविधेत एका सीटवर एकच प्रवासी बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. या सर्व प्रवाशांना मास्क लावूनचं एसटीत प्रवेश देण्यात येणार आहे. यात राज्यातील कोणत्याही रेड झोन कंटेन्मेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला प्रवासाची परवानगी देण्यात येणार नाही. तसेच कुणालाही कंटेन्मेंट झोनमध्ये सोडलं जाणार नाही. प्रवासापूर्वी आणि नंतर एसटीचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं आहे.