सध्या घराबाहेर पडल्यावर बाहेर विकल्या जाणाऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थांवर विश्वास ठेवणे कठीण आहे. डेक्कन क्वीन (Deccan Queen) या लोकप्रिय ट्रेनमधील खाद्यपदर्थांमध्ये, आळ्या (Worms) सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाला ऑम्लेटसोबत खाण्यासाठी घेतलेल्या 'मिरपूड' आणि 'सॉस'मध्ये आळ्या सापडल्या आहेत. 19 जुलै रोजी हा प्रकार घडला आहे. त्यानंतर रेल्वे प्रवासी ग्रुपच्या माध्यमातून 21 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल करण्यात आली. मध्य रेल्वेने (Central Railway) या प्रकरणात लक्ष घालत तातडीने या ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील व्यावसायिक सागर काळे हे 19 जुलै रोजी डेक्कन क्वीनमधून मुंबई-पुणे असा प्रवास करत होते. त्यांनी पँट्री कारमध्ये ऑम्लेटची ऑर्डर दिली. ऑम्लेट आल्यानंतर काळे यांनी त्यासोबत खाण्यासाठी 'सॉस' आणि 'मिरपूड' प्लेटमध्ये घेतली. मात्र समोरचे चित्र पाहून त्यांना धक्का बसला. प्लेटमध्ये चक्क त्यांना आळ्या आढळून आल्या. या घटनेचा व्हिडीओ काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र रेल्वे कर्मचाऱ्याने त्यांना अडवले. (हेही वाचा: मुंबई: ज्यूस बनवण्यासाठी वापरण्यात येणारी गाजरे पायाने धुण्याचा धक्कादायक प्रकार; महापालिकेकडून कारवाई (Video)
याबाबत आयआरसीटीसी प्रशासनाकडे धाव घेतली असता, त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांच्या सल्ल्यानुसार काळे यांनी बुधवारी तक्रार दाखल केली. दरम्यान जितका शूट झाला होता तितका व्हिडीओ त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. सध्या हा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मध्य रेल्वेने या घटनेची दखल घेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.