पायाने गाजरे धुणारा विक्रेता (Photo Credit : Youtube)

प्रशासनाने वेळोवेळी कारवाई करूनही रस्त्यावरील अन्नपदार्थ विक्रेते ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत. काही दिवसांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकामधील लिंबू सरबत बनवणारा किळसवाणा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर मुंबईमधील जवळजवळ अशा सर्व विक्रेत्यांवर कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा एका विक्रेत्याचा पायाने गाजरे धुणारा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ माजली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने कारवाई करत या मंडईतील संबंधित गाळेधारकांना दंड ठोठवला आहे. तसेच बाजार विभागाने गाळेधारकांना नोटीस बजावली आहे.

मुंबईमधील दादर पश्चिम येथील क्रांतीसिंह नाना पाटील मंडई परिसरात पायाने गाजरे धूत असलेला हा व्हिडीओ होता. काही वेळेतच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला. आता महापालिकेने या मंडईतील गाळा क्रमांक 83, 87, 89, 81 या गाळेधारकांना अस्वच्छता केल्याप्रकरणी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाई नंतर हा अस्वच्छतेचा प्रकार पूर्णपणे बंद झाला असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मुंबई सारख्या धकाधकीच्या दिवसात अनेक लोक घराबाहेर पडल्यावर ज्यूस किंवा इतर अनेक पदार्थ बाहेर खातात. मात्र विक्रेत्यांकडून पुरवण्यात येणाऱ्या पदार्थांबाबत योग्य स्वच्छता बाळगली जात नाही. आताचा हा पायाने गाजराने साफ करणारा हा व्हिडीओ याचे ज्वलंत उदाहरण आहे. मात्र आता प्रशासनाने याबाबत कारवाई केली आहे.