बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील (Shivsena) फुटीच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने-यूबीटी (UBT) 20 जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ (World Traitors Day) म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. मागच्या वर्षी 20 जून 2022 रोजी शिवसेना पक्षात फुट पडून, एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणीची केली. त्यानंतर गेले वर्षभर ठाकरे गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या खासदार-आमदारांना 'गद्दर' संबोधत होते.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा पाडाव झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता निवडणूक आयोगाने (ECI) शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून कायदेशीर मान्यता दिली आहे. रविवारी शिवसेनेच्या (UBT) महाराष्ट्र स्तरीय महासभेत उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी 'जागतिक गद्दार दिना' बद्दल त्यांच्या मागण्यांचा उल्लेख केला.
त्यानंतर सोमवारी शिवसेनेच्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त संजय राऊत आणि परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही मागणी पुढे नेली. शिवसेना (यूबीटी) संयुक्त राष्ट्राकडे याचिका दाखल करून 20 जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून घोषित करण्याची औपचारिक मागणी करणार असल्याचे राऊत म्हणाले. ते म्हणाले, यासाठी आम्ही महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करू आणि त्या संयुक्त राष्ट्राला पाठवू.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाच्या या मागणीबाबत सत्ताधारी एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या नेत्यांनी यूबीटीवर हल्ला चढवला. उदय सामंत, संजय शिरसाट आणि रामदास कदम यांसारख्या शिवसेना नेत्यांनी संजय राऊत आणि सेनेवर (UBT) तेच गद्दार असल्याचा आरोप केला. त्यांनी उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्व आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांची गद्दारी केल्याचे म्हटले. (हेही वाचा: Ambadas Danve: अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात? मनिषा कायंदे शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे गटाला हादरा?)
शिरसाट म्हणाले की, त्यांचा पक्ष 20 जून हा दिवस 'गर्व आणि स्वाभिमानाचा दिवस' म्हणून साजरा करेल. कदम म्हणाले की, ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपपासून फारकत घेतली होती आणि जनतेशी 'गद्दारी' केली होती. हिंदुत्वासोबतच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या शिकवणीचाही त्यांनी विश्वासघात केला होता, असेही कदम म्हणाले.