वर्ल्ड एक्स्पो, दुबई (World Expo Dubai) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या परिषदेत 25 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आलेली असून 15,260 कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहे, या माध्यमातून दहा हजारापेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थित हे सामंजस्य करार झाले.
यामध्ये जापान, सिंगापूर, स्वीडन कोरिया जर्मनी इटली व भारत या देशांच्या कंपन्यांनी वाहन व वाहन घटक, लॉजिस्टिक्स, प्राणवायू उत्पादन, ईव्ही, टेक्सटाईल, डेटा सेंटर, औषध निर्माण, जैवइंधन व तेल आणि वायू ई. विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. यासह आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यासाठी आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
1 ऑक्टोबर, 2021 ते 31 मार्च, 2022 या कालावधी मध्ये दुबई (यूएई) येथे वर्ल्ड एक्स्पो या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनामध्ये 190 देश सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील उद्योजक/गुंतवणूकदार, शासकीय विभाग सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन 19 नोव्हेंबर 2021 रोजी मा. मंत्री (उद्योग), श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले आहे. (हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे MSTRC चे 19 नोव्हेंबर पर्यंत 279 कोटी रुपयांचे नुकसान)
दरम्यान, दुबईच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 18 ते 23 दरम्यान दुबई एक्सपोचे आयोजन केले आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान सहा चित्रपट, एक मराठी वेबसिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा दुबई एक्सपोमध्ये दाखविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. कडू गोड, तक तक, ताजमहल, बारडो, गोष्ट एका पैठणीची, गोदाकाठ असे 6 चित्रपट, वेब सिरीज आणि महाराष्ट्राची चित्रधारा यावेळी दाखविण्यात येणार असून यामध्ये 20 लोककलाकार सहभागी होणार आहेत.