Chhatrapati Shivaji Maharaj Hospital Thane (PC-Twitter)

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) एका महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे. वागळे इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथे राहणारी महिला 2 दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल झाली होती. शुक्रवारी या महिलेची सिझेरीयन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. त्यानंतर तिची प्रकृती चांगली असतानाही शनिवारी सकाळी त्या महिलेचा मृत्यू झाला.

दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. बाळंतिनीचा प्रसूतीनंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयांत गोंधळ घातला. (हेही वाचा - महाराष्ट्रावर अवकाळी सावट; पुण्यात रिमझिम, नगरमध्ये तुरळक पाऊस, काही ठिकाणी वातावरण ढगाळ; शेतकरी चिंतेत)

मागील महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 26 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला होता. डॉक्‍टरांनी तपासणीसाठी विलंब केल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या अगोदरदेखील अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.